सातार्‍यातील आमदारांचे तळ्यात मळ्यात; देवगिरीवर पोहचल्यावरच दादांच्या बंडाची माहिती

सातार्‍यातील आमदारांचे तळ्यात मळ्यात; देवगिरीवर पोहचल्यावरच दादांच्या बंडाची माहिती
Published on
Updated on

सातारा / खटाव; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी दुपारपूर्वी केलेल्या बहुचर्चित राजकीय बंडाची कल्पना बालेकिल्ला असणार्‍या सातारा जिल्ह्यातील आमदारांना सकाळपर्यंत नव्हती. शनिवारी रात्री अजित पवारांबरोबर जेवायला असणार्‍या आमदारांनाही याची कुणकुण लागली नव्हती. शनिवारी रात्री अजित पवारांनी उद्या सकाळी लवकर बंगल्यावर या, मिटींग आहे इतकाच निरोप आमदारांना दिला होता. रविवारी सकाळी बंडाचा विषय आणि निर्णय घेण्याची वेळ अचानक आल्याने सातार्‍याच्या आमदारांची अवस्था तळ्यात- मळ्यात अशी झाली.

रविवारी अजित पवारांनी राज्याला हादरवणारा निर्णय घेत राष्ट्रवादीविरोधात बंड केले. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची तयारी अनेक महिने सुरु होती. त्यावेळी बंड करणारे आमदार एकत्र येवून राज्याबाहेर गेले होते. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर राज्यपालांना सरकार स्थापनेचे पत्र देवून शिंदे – फडणवीस सरकार अस्तित्वात आले होते. मात्र, अजित पवारांनी केलेले बंड आणि घेतलेला निर्णय खूप झटपट होता. अगदी शनिवारी रात्रीपर्यंत राष्ट्रवादीच्या आमदारांना याविषयी कल्पना नव्हती.

राष्ट्रवादीच्या दृष्टीने पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील काही आमदार शनिवारी रात्री अजित पवारांसमवेत जेवायला एकत्र होते. तिथेही त्यांना या बंडाची कुणकुण लागली नव्हती. अजित पवारांनी त्यावेळी आमदारांना उद्या सकाळी बंगल्यावर या. महत्वाची मिटींग आहे इतकाच संदेश दिला होता.

अजित पवारांचे फर्मान असल्याने रविवारी सकाळी जिल्ह्यातील आमदार देवगिरीवर गेले आणि तिथे गेल्यावर त्यांना अजित पवार करत असलेल्या बंडाची माहिती मिळाली. शरद पवार यांना सोडून अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यासाठी काहींनी अजित पवारांकडे वेळ मागितला. अगदी मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे, असे सांगूनही जिल्ह्यातील आमदारांनी वेळ मागून घेतल्याचे समजत आहे. आपापल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेतो असे सांगून जिल्ह्यातील आमदार परतले आहेत. खा. शरद पवार जिल्ह्यात आल्यावर त्यांच्या बरोबर कोण कोण कराडमध्ये हजर राहणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news