

– विकास कांबळे, कोल्हापूर
नेत्यांचे एका पाठोपाठ होणारे दौरे म्हणजे राजकीय पक्षांची जणू दुबार पेरणीच आहे. दुष्काळी सावट असताना जशी दुबार पेरणी करावी लागते, तशीच नेत्यांचीही बदललेल्या राजकीय परिस्थितीत दुबार पेरणी सुरू आहे. त्याला आगामी निवडणुकीत आपले बुरूज भक्कम करण्यासाठी वारंवार होणार्या दौर्यांतून नेते चाचपणी करत असल्याने जनताही नेत्यांच्या भूमिका आजमावत आहे. त्यामुळे दौर सुरू असले तरी नेत्यांना राजकीय परिस्थितीचा अंदाज आलेला नाही. वारंवार बदलणार्या राजकीय भूमिकांमुळे जनताही निवडणुकीपर्यंत कोण-कोणासोबत जाईल, याचा अंदाज बांधत आहेत.
अभेद्य शिवसेनेला झटका देत एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर सवता सुभा सुरू केला आणि राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. हे कमी होते म्हणून की काय, अनपेक्षितरीत्या अजित पवार यांनी पूर्वीचा पहाटेचा भाजपसोबतचा शपथविधी विसरून पुन्हा एकदा भाजपसोबत गाठ बांधली. त्यामुळे राजकीय वातावरण कमालीचे अस्थिर झाले. सत्तेत सहभागी होण्याच्या अगोदर काही दिवसांपर्यंत भाजपवर टोकाची टीका करत होते. तेच अचानकपणे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आणि नवा अध्याय सुरू झाला.
या सार्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर जनता अवाक झाली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राजकीय भूमिकांनी जनतेला संभ्रमात टाकले. येणार्या निवडणुकीत काय होईल, याची चिंता नेत्यांना आहे. त्यामुळेच जनतेचा कल आजमाविण्यासाठी नेते थेट जनतेत जात आहेत. सरकार आपल्या दारी हा उपक्रम असो किंवा नेत्यांचे स्वतंत्र दौरे असोत, या सार्यांतून सरकारसह सरकारमधील सहभागी पक्ष हे जनतेचा कल आजमावत आहेत. जनता मात्र हे दौरे आणि नेत्यांच्या भूमिकेकडे तटस्थपणे पाहत आहेत. त्यामुळे नेत्यांना म्हणावा तसा अंदाज आलेला दिसत नाही.
राज्यातील सत्ता बदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापुरात शक्तिप्रदर्शन केले. शिवसेनेतील फुटीमध्ये जिल्ह्यातील खासदार, आमदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला. परंतु शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा महत्त्वाचा होता. या कार्यक्रमाला गर्दी करण्यात शिंदे गट यशस्वी झाला; परंतु या दौर्यात नवीन तगडे कार्यकर्ते मिळतील, अशी जी अपेक्षा होती ती मात्र फोल ठरली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांनी जे फुटले त्या विधानसभा मतदार संघातील दौरे निश्चित करून सभा घेण्याचे ठरविले. त्यानुसार कोल्हापुरात नुकतीच त्यांची सभा झाली. हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आहेत. तेच आ. राजेश पाटील, माजी आ. के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना घेऊन भाजपसोबत गेल्यामुळे शरद पवार गटाकडे तसा ताकदीचा नेता कोणी राहिला नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या दसरा चौकातील सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या सभेला मिळालेला चांगला प्रतिसाद आणि शाहू महाराज यांनी सभेचे भूषविलेले अध्यक्षपद यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना चांगलीच ऊर्जा मिळाली.
शरद पवारांनी सभा सुरू केल्यानंतर अजित पवार गटानेही सभा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातील एक सभा कोल्हापुरात आहे. शरद पवार यांच्यापेक्षा जास्त गर्दी करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ व त्यांच्या सहकार्यांचा सुरू आहे. त्यासाठी त्यांची जोरात तयारी सुरू आहे.
जिल्ह्यात सर्वात अधिक आमदार काँग्रेसचे आहेत. परंतु, काही तालुक्यांत काँग्रेसची ताकद अजिबात दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्याचा प्रयत्न आ. सतेज पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. त्याला ग्रामीण भागातून अतिशय चांगला प्रतिसाद आहे. अन्य पक्षांतील फाटाफुटीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काँग्रेसला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करण्याची संधी दिसते. डाव्या, पुरोगामी पक्षांनी स्थापन केलेल्या प्रागतिक पक्षांचीही कोल्हापुरात नुकतीच बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या विरोधात एकत्र लढण्याचा निर्धार करण्यात आला. परंतु, इंडियासोबत जायचे की नाही, याबाबत मात्र अद्याप त्यांच्यात एकमत झालेले नाही.