

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जनतेची अधिक पसंती असल्याचे म्हटल्याने शिवसेना-भाजपमध्ये दुसर्या दिवशीही कलगीतुरा रंगला होता. या जाहिरातीने भाजपच्या कार्यकर्त्यांची मने दुखावल्याचे सांगत, यापुढे अशी चूक होता कामा नये, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. भाजपकडून होणार्या टीकेला शिंदे गटातून प्रत्युत्तर दिले गेल्याने हा कलगीतुरा चांगलाच रंगला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप नाराज आहेत. त्यांनी दुसर्याही दिवशीचा दौरा रद्द केला.
शिवसेनेची जाहिरात म्हणजे खोडसाळपणा होता, अशा शब्दांत बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त करत, असे प्रकार यापुढे टाळले पाहिजेत, असे सुनावले. जाहिरातीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना अचंबित करणारी आहे. या जाहिरातीमुळे आमच्या कार्यकर्त्यांची मने दुखावली आहेत. हा खोडसाळपणा दुरुस्त करण्याचा प्रयत्न बुधवारी झाला; मात्र पुन्हा असे होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस भाजपचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांनी राज्यात लाखो कार्यकर्त्यांना घडवले असून, पक्ष वाढवण्यासाठी काम केले आहे. त्यामुळे जाहिरात प्रकरणामुळे भाजपच्या पदाधिकारी,
आमदार, खासदार यांची मने दुखावली आहेत. शिंदे उत्कृष्ट आहेत; पण त्यांची फडणवीस यांच्याशी तुलना योग्य नाही. परंतु, हा विषय आता संपलेला आहे, असे सांगत बावनकुळे यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनेच्या जाहिरातीवरून नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी दुसर्या दिवशीही कायम होती. त्यांनी बुधवारीही दौरा रद्द करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या कार्यक्रमांना हजर राहणे टाळले. शिवसेनेने केलेल्या जाहिरातीत राज्यातील जनतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पसंती दिल्याचे दाखविल्याने फडणवीस नाराज आहेत. त्यामुळे मंगळवारी कोल्हापूरचा दौरा फडणवीस यांनी अचानक रद्द केला. दुसर्या दिवशी त्यांनी आपल्या खात्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेतल्या. मात्र, त्यांनी शिंदेंसोबत कार्यक्रमांना हजेरी लावली नाही.
एस.टी.चा अमृतमहोत्सवी वर्धापन दिन सोहळा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. मात्र, फडणवीस या कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत.
फडणवीस यांच्या कानाच्या पडद्याला इजा झाली असून, त्यांना विमान प्रवास आणि लाऊडस्पीकरवर होणारे कार्यक्रम टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.
भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी तर एकनाथ शिंदे यांना ठाणे म्हणजे महाराष्ट्र वाटतो का? असा संतप्त सवाल केला. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनत नाही, अशा शब्दांत अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत; मात्र त्यांना त्यांच्या आजूबाजूचे लोक चुकीचे सल्ले देत आहेत, असा हल्लाही त्यांनी चढविला.
मुख्यमंत्र्यांवर टीका करणार्या बोंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र स्तुतिसुमने उधळली आहेत. बहुजनांसाठी काम करणारा हा महाराष्ट्रातील चेहरा आहे. त्यांचे नाव सर्वत्र आदराने घेतले जाते, असे बोंडे म्हणाले.
डॉ. अनिल बोंडे यांच्या टीकेला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपचे नेते चुकीची वक्तव्ये करत असून, त्यांनी अशी विधाने टाळली पाहिजेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचे नेते आहेत, असे देसाई म्हणाले. 50 आमदार आणि 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. यावरून ते किती मोठे नेते आहेत, हे सिद्ध झाले आहे. त्यांची दखल राज्याने नाही, तर देशाने घेतली आहे, असा पलटवारही देसाई यांनी केला.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही बोंडे यांना प्रत्युत्तर दिले. शिवसेना आणि एकनाथ शिंदे हे वाघ आहेत आणि 50 वाघांमुळेच भाजपच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. तुम्ही कोणाच्या संगतीने मोठे झालात याचा विचार करा.
बाळासाहेब ठाकरेंचे बोट पकडून आपण मोठे झाला आहात. नाही तर तुमची काय औकात होती हे लक्षात ठेवा, असे सांगताना अनिल बोंडे यांनी बोलताना आत्मचिंतन करून बोलावे, असा सल्ला गायकवाड यांनी दिला. दरम्यान, युती सरकारात सहभागी असलेले प्रहार पक्षाचे नेते आ. बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, शिंदे यांनी उठाव केला नसता, तर युतीची सत्ता आलीच नसती.