

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शेतक-यांच्या हिताची मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली. राज्यात सत्तांतर होताच अनेक शेतक-यांना योजनेचा लाभदेखील मिळाला, पण गेले दोन महिन्यांपासून शेतक-यांना शेततळ्यासाठी महाडीबीटीवर ऑनलाईन अर्जच भरता येत नाही. अर्ज भरता येत नसल्याच्या अनेक लेखी, ऑनलाईन तक्रारी करण्यात आल्या. परंतु, त्रुटी दूर करण्यात न आल्याने शेतकर्यांना अर्ज भरणे कठीण झाले आहे.
राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरू केले आहे. परंतु, या पोर्टलच्या माध्यमातून शेतक-यांना गेली एक महिन्यापासून कोणत्याही योजनेसाठी अर्ज करता येत नाही. प्रामुख्याने मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे योजनेसाठी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे.
शासनाच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी महाडीबीटी पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकर्यांना विविध योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येतात. परंतु, काही दिवसांपासून महाडीबीटी पोर्टलवर तांत्रिक अडचण असल्याने शेतकर्यांना विविध योजनांसाठी अर्ज करताना अडचणी येत आहेत. यामुळे शेतकर्यांचा वेळ वाया जात आहे. तसेच योजनांचा लाभसुद्धा घेता येत नाही.
महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकर्यांना फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण घटकातील विविध योजना, शेती अवजार, सिंचन बाबींसह शेती संबंधित विविध योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन लॉटरी काढली जाते. नंबर लागणा-या शेतक-यांना त्यांनी अर्ज भरताना रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एसएमएस येतो.
त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची ऑनलाईन पूर्तता करावी लागते. त्यानंतर संबंधित योजनेचे काम पूर्ण झाल्याचे फोटो, बिले अपलोड केल्यानंतर संबंधित शेतक-यांच्या बँक खात्यावर अनुदानाचे पैसेदेखील जमा होतात. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून हे ऑनलाईन पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतक-यांना अर्ज दाखल करणे कठीण झाले आहे.