

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा आज जया माघी एकादशी सोहळ्याला राज्यभरातुन 5 लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. शेकडो दिंड्या पंढरीत दाखल झाल्या असून, पंढरीनगरी भाविकांनी गजबजली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, आज (बुधवार) पहाटे एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्य शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची तर सदस्य दिनेशकुमार कदम यांच्या हस्ते रुक्मिणीची महापूजा पार पडली. माघी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात विविध पानाफुलांची आकर्षक, मनमोहक सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
माघी यात्रेला आलेले भाविक चंद्रभागेत स्नान करण्यासाठी गर्दी करत आहेत. चंद्रभागा वाळवंट भाविकांनी फुलले आहे. तर स्नान झाल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे गर्दी करत आहेत. मुख दर्शन, कळस दर्शन घेण्यासाठी भाविक मंदिराकडे येत आहेत, तर पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी आतुर झालेल्या भाविकांना दर्शन रांगेत उभारावे लागत आहे. दर्शन रांग पत्राशेड मधील 6 दर्शन शेड भरून पुढे रांग गोपाळपूर रस्त्यावर दर्शन रांग गेली आहे. एक लाख भाविक दर्शन रांगेत उभे आहेत, तर 65 एकर येथे 2 लाखाहून अधिक भाविक तंबू, राहुट्या उभारून वास्तव्य करत आहेत. तर मठ, मंदिर, धर्मशाळा, शिक्षण संस्था आदी ठिकाणी भाविक भजन, कीर्तन व प्रवचनात दंग असल्याने पंढरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रभागा नदीपात्रात स्नान करताना भाविकांबाबत कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून आपती व्यवस्थापन विभागाकडून चार स्पीड बोटी (जीवरक्षक) तैनात करण्यात आलेल्या आहेत. तर यात्रेत चोर्या मार्या होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. 125 सीसीटिव्ही कॅमेर्यांची देखील करडी नजर असणार आहे. तसेच पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिमत्तराव जाधव, डिवायएसपी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 1550 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. तर भाविकांच्या वेशात पोलीस कर्मचारी सेवा बजावणार असल्याने यात्रेत होणार्या चोर्यांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.
दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीकडून शुध्द पाणी, चहा, नाश्ता पुरवला जात आहे. तर दर्शनासाठी 8 ते 10 तासांचा कालावधी लागत आहे.
हेही वाचा :