

कोल्हापूर : शाहूपुरीसह राजारामपुरी परिसरात आलिशान कार्यालये थाटून दामदुपटीच्या आमिषाने गुंतवणूकदारांच्या फसवणुकीची एकेक प्रकरणे चव्हाट्यावर येत असतानाच, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील एका सराईत टोळीने कोल्हापूर, सांगली, नाशिक, कोपरगाव परिसरात दोनशेहून अधिक कोटींचा गंडा घातल्याचे उघडकीला येत आहे.
हातकणंगले येथील म्होरक्यासह संचालकांनी शाहूपुरी परिसरातील दोन, इचलकरंजी, जयसिंगपूर, नाशिक, कोपरगाव परिसरात मोठा गाजावाजा करून थाटलेल्या कथित कंपनीच्या सहाही आलिशान कार्यालयांना टाळे ठोकून गाशा गुंडाळला आहे. शेअर मार्केट, क्रिप्टो करन्सी, सोन्याच्या कॉईनचा व्यापार; शिवाय गुंतवणुकीवर दरमहा 10 टक्के परतावा, सहा महिन्यांत दामदुप्पट अशा एक ना अनेक फसव्या आमिषांचे गाजर दाखवून म्होरक्यासह संचालक व घसघशीत कमिशनवर नेमलेल्या एजंटांच्या साखळीतून उद्योग, व्यावसायिक, कारखानदारांसह शेतकरी, विशेषकरून महिलावर्गाची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे उघडकीला येत आहे.
पोलिस अधीक्षकांकडून दखल; मात्र 'हातकणंगले'कडून बेदखल
मजले (ता. हातकणंगले) येथील माजी उपसरपंच विनायक वसंत कोठावळे यांनी हातकणंगले पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवले. दिलेला तक्रार अर्ज माघारी घेण्यासाठी अधिकारी, पोलिसांमार्फत प्रयत्न झाले. अखेर कोठावळे यांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन तक्रार अर्ज सादर केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, संशयित राजकीय आश्रयाने आजही मोकाट आहेत.
अधिकार्यांकडून मिळेना दाद
फसगत झालेले राहुल शामराव पुजारी यांच्यासह कमल महाजन, अमर संकपाळ, संजय चव्हाण, अश्विनी चव्हाण, अभिजित साळोखे, प्रथमेश पाटील, सुनील पुनवतकर, कविता धादवड, नीलेश पाटील, बाबासाहेब सुतार, विद्या शिंगाडे, महेश चौगुले, राजेंद्र खोत आदींनी विविध पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्यांकडे लेखी स्वरूपात कैफियत मांडली; पण त्यांना दाद मिळत नाही.
गुंतवणूकदारांसह कुटुंबीयही धास्तावले
कोट्यवधींची फसवणूक करून म्होरक्यासह साथीदार पसार झाल्याने गुंतवणूकदारांसह त्यांचे कुटुंबीय धास्तावले आहेत. गुंतवणूकदारांनी हातकणंगले, शाहूपुरी, इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यांकडे धाव घेतली. रीतसर तक्रारीही दाखल केल्या. मात्र, प्रभारी अधिकार्यांनी तक्रारींना केराची टोपली दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.