

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा अंतिम टप्प्यात असताना लखनौ सुपर जायंट्सला मोठा झटका बसला आहे. या संघाचा 21 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध एकाना येथे झालेल्या सामन्यात मयंक यादव साइड स्ट्रेनमधून सावरला होता पण त्याच सामन्यात गोलंदाजी करताना त्याची दुखापत पुन्हा बळावली. अशा परिस्थितीत त्याला सामना सुरू असतानाच मैदान सोडावे लागले. त्यानंतर हा युवा स्पीड स्टार आता आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार नाही, असा स्पष्ट खुलासा संघ व्यवस्थापनाने केला आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी केकेआरविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला ही माहिती दिली. लँगर म्हणाले की, 'मयंक यादव इंडियन प्रीमियर लीगच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या पोटाच्या खालच्या स्नायूला दुखापत झाली आहे. तो प्लेऑफमध्ये खेळेल अशी अपेक्षा आहे, पण त्यावर आमचे वैद्यकीय पथक अंतिम निर्णय घेईल,' असा खुलासा केला.
यंदाच्या आयपीएलमध्ये मयंकने 155 च्या वेगाने गोलंदाजी करत चार सामन्यात सात विकेट्स घेतल्या. पण दोन सामन्यांत त्याला चार षटकांचा कोटाही पूर्ण करता आला नाही. लँगर म्हणाले, 'मयंकचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी त्याला आधी दुखापत झाली होती त्याच ठिकाणी त्याला पुन्हा वेदाना होत आहेत. हे दुर्दैवी आहे. मयंकने याबाबत बुमराहशी फोनवरून चर्चा केली आहे. ज्यानंतर बुमराहने त्याला योग्य सल्ला दिला आहे.'
21 वर्षीय मयंकने 30 मार्च रोजी एलएसजीसाठी पदार्पण केले. पहिल्या दोन सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारा तो आयपीएल इतिहासातील पहिला खेळाडू ठरला. मयंकने मोसमातील आपल्या तिसऱ्या सामन्यात फक्त एकच षटक टाकले आणि पोटदुखीमुळे त्याला बाहेर पडावे लागले. त्यानंतर मयंकने मुंबई इंडियन्सविरुद्ध पुनरागमन केले. पण दुखापत बळावल्याने तो सामन्यातून बाहेर पडला.
लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) सध्या 10 सामन्यांमधून सहा विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. एलएसजीचा पुढील सामना रविवारी घरच्या मैदानावर केकेआरविरुद्ध होणार आहे. यानंतर लखनौला SRH, DC आणि MI विरुद्ध सामने खेळायचे आहेत.