

लखनौ; वृत्तसंस्था : फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांतील सांघिक कामगिरीच्या जोरावर लखनौ सुपर जायंटस्ने गुजरात टायटन्सला 33 धावांनी हरवून स्पर्धेतील तिसरा विजय नोंदवला. लखनौच्या मार्कस स्टॉयनिसने 58 धावांची खेळी केली, तर गोलंदाजीत यश ठाकूरने 5 आणि कृणाल पंड्याने 3 विकेटस् घेतल्या. मात्र रवी बिश्नोईने एकच विकेट घेतली असली तरी स्वत:च्या गोलंदाजीवर विल्यम्सनचा परतीचा घेतलेला झेल या सर्वांपेक्षा सरस ठरला.
लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर रविवारी झालेल्या दुसर्या सामन्यात लखनौ सुपर जायंटस्च्या 163 धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला शुभमन गिल व साई सुदर्शन यांनी चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी 54 धावांची सलामी दिली. मात्र, गिल 19 धावांवर बाद झाल्यानंतर गुजरातचा डाव गडगडला. पण, बिनबाद 54 वरून त्यांची गाडी 4 बाद 61 अशी घसरल्याने सामन्यात लखनौने वर्चस्व मिळवले. रवी बिश्नोईने यंदाच्या आयपीएलमधील सर्वोत्तम झेल घेत केन विल्यम्सनला माघारी पाठवले. हा यंदाच्या स्पर्धेतील बेस्ट कॅच ठरू शकतो, इतका सुंदर झेल त्याने टिपला. यानंतर ठराविक अंतराने गुजरातच्या विकेटस् पडत गेल्या. यश ठाकूरने आयपीएलमध्ये 5 विकेटस् घेण्याची कामगिरी बजावली. त्यामुळे गुजरातचा डाव 18.5 षटकांत 130 धावांत आटोपला.