

नवी दिल्ली : ब्लड शुगर वाढणे अथवा कमी होणे, या दोन्ही स्थिती शरीरासाठी हानीकारक मानल्या जातात. सर्वसामान्यपणे शुगर लेवल वाढल्यासंदर्भातच जास्त चर्चा होत असते. वाढलेले शुगरचे प्रमाण हे शरीरातील अनेक अवयवांसाठी हानीकारक मानले जाते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित आणि मानक पातळीवर ठेवण्यासाठी प्रयत्नांची गरज असते.
आरोग्य विशेषज्ञांच्या मते, ब्लड शुगरचे प्रमाण वाढणे, ही जितकी गंभीर स्थिती आहे, तितकीच कमी होणेही अत्यंत धोकादायक ठरते. यामुळेच ज्यांना मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी सातत्याने आपली शुगर लेव्हल तपासली पाहिजे. यामुळे शुगर लेवल नियंत्रणात आहे की नाही, हे समजते.
लो-ब्लड शुगर म्हणजे हाईफोग्लाईसेमिया. यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या जटिलता निर्माण होतात. विशेषज्ञांच्या मतानुसार, ज्यावेळी रक्तामधील ग्लुकोजचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा कमी होते, त्यावेळी लो ब्लड शुगरची स्थिती निर्माण होते. यास काही वेळा डायबिटीसची औषधे आणि इन्सुलिनही कारणीभूत ठरते. हाईफोग्लाईसेमियाचे परिणाम अल्पकालिक आणि दीर्घकालिकही होऊ शकतात. यामुळेच अशा स्थितीतील लोकांनी खबरदारी घेणे अथवा सावधानता बाळगणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.