

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला बुधवारपासून प्रारंभ होत असून महाराष्ट्रात विदर्भाच्या पाच जिल्ह्यांत लोकसभा मतदारसंघांत निवडणूक अधिसूचना जारी होऊन उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरूवात होईल. या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होत आहे. त्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश असेल. इथे २७ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. २८ मार्चला या अर्जाची छाननी केली जाईल. वैध ठरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३० मार्चपर्यंत मुदत असेल.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा हे चंद्रपूर जिल्ह्यातील ४, तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी या एकूप सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. एकूण १८ लाख ३६ हजार ३१ मतदार आहेत. गडचिरोली लोकसभ मतदारसंघ अनुसूचित जमातीच्य (एसटी) उमेदवारासाठी राखीव आहे गडचिरोलीतील आरमोरी, गडचिरोल आणि अहेरी असे तीन तसेच चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी, चिमूर गोंदियातील आमगाव अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघात १४ लाख १३ हजार ९६ मतदारांचा समावेश आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली, तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, तिरोडा व गोंदिया या मतदारसंघांचा समावेश आहे. नागपूर आणि रामटेक या दोन नागपूर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांत नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होत असून, येथे ४२ लाखांहून अधिक मतदार आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.