वेध लोकसभेचे : फर्नांडिस यांच्या सभेतच डॉ. काळदातेंचा विजय नक्‍की झाला

संग्रहित छायाचित्र : सौजन्य दिलीप थोरात : डॉ. बापूसाहेब काळदाते यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेप्रसंगी अटलबिहारी वाजपेयी, भाऊ थोरात, डॉ नामदेव गाडेकर, डॉ टी. एस. पाटील.
संग्रहित छायाचित्र : सौजन्य दिलीप थोरात : डॉ. बापूसाहेब काळदाते यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेप्रसंगी अटलबिहारी वाजपेयी, भाऊ थोरात, डॉ नामदेव गाडेकर, डॉ टी. एस. पाटील.
Published on
Updated on

आणीबाणीचे पर्व संपले होते आणि लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. (१६ ते २० मार्च १९७७ या काळात मतदान झाले.) छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून जनता पक्षाने ज्येष्ठ नेते डॉ. बापूसाहेब काळदाते यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने चंद्रशेखर राजूरकर यांना उमेदवारी दिली होती. काळदाते यांना २, ०१, ०२१ तर राजूरकरांना १, ४३, ९३२ मते मिळाली. ५७ हजारांचे मताधिक्य घेत डॉ. काळदाते विजयी झाले. काँग्रेस विरोधी लाट, नवनिर्मित जनता पक्षाचे वलय, चहाचीही अपेक्षा न करणारे कार्यकर्ते अशा वातावरणात निवडणूक झाली होती. साहजिकच बापूंचा लोकसभेत जाण्याचा मार्ग प्रशस्त झाला.

या निवडणुकीला यू टर्न देणारी सभा ठरली, ती कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांची. कर्नाटकात जन्मलेले जॉर्ज हे नोकरीसाठी म्हणून मुंबईत १९४९ साली आले आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचारांनी प्रभावित होत कामगार नेते बनले. 1974 मध्ये जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली झालेला रेल्वे कर्मचार्‍यांचा संप चांगलाच गाजला. जॉर्ज आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन नेतेच मुंबई बंद करू शकत असे म्हटले जात असे. त्यामुळे युवा वर्गातही जॉर्ज यांच्याविषयी मोठे आकर्षण होते. जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी जॉर्ज यांचा मराठवाडा दौरा ठरला होता.

बीड, परभणी येथे सभा होती. मधला काही वेळ रिकामा होता. या वेळेत जॉर्ज यांची सभा घ्यावी, असे बापूसाहेबांचा प्रचार करणार्‍या कार्यकर्त्यांना वाटले आणि त्यांनी जॉर्ज यांना विनंती केली. पण एवढ्या कमी वेळेत सभा कशी होईल, अशी शंका जॉर्ज यांनाही पडली. तेव्हा आयोजकांनी सभा यशस्वी करण्याची हमी दिली आणि भोंगे फिरू लागले. पूर्वनियोजन नसताना संभाजीनगरच्या आमखास मैदानावर झालेल्या या सभेत व्यासपीठावर जॉर्ज उभा राहिले तेव्हा संपूर्ण मैदान भरले होते. या सभेतच बापूसाहेब निवडून येणार हे नक्‍की झाले. १९८० च्या निवडणुकीत ते हिंगोलीतून उभे होते. त्यांचा उत्तमराव राठोड यांनी १ लाख १७ हजार मतांनी पराभव केला होता. या काळात शरद पवार यांनी काढलेल्या जळगाव ते नागपूर शेतकरी दिंडीत बापू सहभागी झाले होते.

भावी मुख्यमंत्री अशी ओळख

तसे बापूसाहेब हे मूळ बीड जिल्ह्याचे. पण शिक्षणासाठी पंढरपूर येथे राहिल्यानंतर त्यांचा संबंध राष्ट्र सेवा दलाशी आला.
वक्‍तृत्वाची देणगी त्यांना जन्मजातच लाभली की काय असे समोरच्यांना वाटावे. आणीबाणीत ते नाशिक कारागृहात स्थानबद्ध होते. भाजप नेते प्रमोद महाजन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मी वक्‍तृत्व कला शिकलो, ती बापूंकडून. १९६७ मध्ये त्यांनी लातुरात समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढविली आणि तत्कालिन सहकारमंत्री केशवराव सोनवणे यांना पराभूत केले. तेव्हा भावी मुख्यमंत्री अशी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली. जायंट किलर असेही त्यांना म्हटले जात असे.

१९७२ मध्ये मात्र त्यांनी मतदारसंघ बदलला. केजमधून त्यांनी निवडणूक लढविली व त्यांच्या विरोधात काँग्रेसने बाबूराव आडसकर यांना उभे केले. बापूसाहेब फर्डे वक्‍ते तर बाबूराव यांना ग्रामीण ढंग असलेली शैली. बापूसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत असे. नेमकी हिच बाब हेरून आडसकरांनी प्रचार केला. ग्रामीण भागात मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क सुरू केला. जिल्हा परिषदेचे सदस्य असल्यामुळे विविध विकास कामे त्यांनी केली होती. त्यामुळे त्यांनी मतदारांना आवाहन केले की, विकास पाहिजे असेल तर मला मते द्या आणि बापूसाहेबांना गणपतीत भाषणाला बोलवा. या अटीतटीच्या निवडणुकीत बापूसाहेब पराभूत झाले. आडसकर यांनी बाजी मारली. आडसकर हे मुंबईत गेल्यावर त्यांना पत्रकारांनी विचारले, की बापूसाहेबांना तुम्ही कसे पराभूत केले? तेव्हा आडसकर म्हणाले, 'दिला हाबाडा'. तेव्हापासून राजकारणात कोणी पराभूत झाल्यास हाबाडा हा शब्दप्रयोग मराठवाड्यात वापरला जावू लागला.

सरकारचे मोफत घर नाकारले

बापूंचा राज्यात प्रचंड वावर होता. म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बापूंना मुख्यमंत्री कोट्यातून मोफत घर दिले. डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी त्यासाठी कोणताही अर्ज केला नव्हता. या घराच्या नोंदणीचा खर्च १० हजार होता. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी डॉ. बापूसाहेब काळदाते यांच्या घराचे पैसे स्वतःच्या खिशातून दिले आणि अर्ज स्वाक्षरीसाठी पाठवला. कै. बापूसाहेब काळदाते यांनी सही न करता तो अर्ज विनम्रपणे वापस पाठवला. आणि घर नाकारले. (संदर्भ : नरेंद्र काळे यांची फेसबुकवरील पोस्ट)

राष्ट्रीय राजकारणात सक्रिय

पुलोदच्या जडणघडणीतही त्यांचा वाटा होता. बापूसाहेबांचे व्यक्‍तिमत्व हे काही महाराष्ट्रापुरते मर्यादित राहणारे नव्हतेच. जनता पक्ष स्थापनेनंतर ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले. राज्यसभेचे दोन टर्म ते सदस्य होते. चंद्रशेखर हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी बापूंना मंत्रिमंडळात येण्याची ऑफर दिली. पण पक्ष कार्याला त्यांनी स्थान दिले. जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून ते काही काळ कार्यरत होते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात त्यांनी खासदार या नात्याने अनेकवेळा भाग घेतला. सर्वच पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे मैत्रीसंबंध होते. राजकारणातून निवृती घेतल्यानंतर संभाजीनगर येथील स. भु. शिक्षण संस्थेची जबाबदारी त्यांनी काही काळ सांभाळली. १७ नोव्हेंबर, २०११ रोजी डॉ. बापूसाहेब काळदाते यांचे निधन झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news