काँग्रेसची सत्ता आल्यास देश जातींमध्ये विभागेल : योगी आदित्यनाथ

सांगली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसची सत्ता आल्यास देश जाती-जातीत विभागला जाईल. काँग्रेसचा जातनिहाय जनगणनेचा उद्देश तोच आहे. दलित, आदिवासी, ओबीसी आरक्षणावर दरोडा टाकून त्यातील वाटा मुस्लिमांना दिला जाईल. त्यामुळे देशवासीयांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. देशाची सुरक्षा, देशाच्या संपन्न वारशाचा सन्मान, आत्मनिर्भर आणि विकसित भारत यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला विजयी करा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

येथील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवारी भाजप महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी महाविजय संकल्प सभा झाली, यावेळी भाजपचे फायरब्रॅण्ड नेते योगी आदित्यनाथ बोलत होते.

निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहासजमा…

योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसच्या सत्ताकाळात रंगनाथ मिश्रा कमिटी स्थापन झाली होती. ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणात 6 टक्के आरक्षण मुस्लिमांना वाटप करण्याची शिफारस केली होती. काँग्रेसने नेमलेल्या सच्चर समितीने मुस्लिम समाजातील काही जातींना दलितांत समाविष्ट करून दलित आरक्षणावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपने या दोन्ही बाबींना कडाडून विरोध केला. धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याला तीव्र विरोध केला. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी सत्तेत आली, तर देशातील हिंदूंची जाती-जातीत विभागणी केली जाईल. हिंदू समाजाला आपसात लढविले जाईल. देशातील जनता हे कदापिही होऊ देणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहासजमा होईल.

…तर गोहत्या, गोमांस भक्षण सुरू होईल

काँग्रेसने जात, धर्माच्या आधारावर व्होट बँकेचे राजकारण केले. देशात काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यास अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडी-निवडीनुसार खानपान यामध्ये स्वातंत्र्य दिले जाईल, असे काँग्रेसच्या इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा गोहत्या, गोमांस भक्षण सुरू होईल. गोहत्या, गोमांस भक्षणाला प्रेरणा देणार्‍यांना मत देणार का, असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला.

अटक ते कटक… ही भूमी शूरांची!

ते म्हणाले, महाराष्ट्राची भूमी ही शौर्याची आहे. ही भूमी वीरांची आहे. अटक ते कटकपर्यंत देशाचा विस्तार या भूमीतील वीरांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केला. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांनी देश स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले. एक राष्ट्र ही संकल्पना पहिला बाजीराव पेशवा यांनी वाढवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशात समता निर्माण केली.

2014 पूर्वी आणि 14 नंतर…

योगी आदित्यनाथ म्हणाले, 2014 पूर्वीचा भारत आणि 2014 नंतरचा भारत पाहिल्यास मोदी यांच्या नेतृत्वाची चमक दिसून येेते. 2014 पूर्वी जगात भारताचा सन्मान कमी झाला. दहशतवाद, नक्षलवाद फोफावला. सीमा सुरक्षित नव्हती. 2014 नंतर मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची सीमा सुरक्षित आहे. दहशतवाद संपला. नक्षलवादी हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले. भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत पाकिस्तानमध्ये राहिली नाही. भारत ही जगातील पाचवी अर्थसत्ता बनली आहे. दोन वर्षात ती जगातील तिसरी अर्थसत्ता बनेल.
ते म्हणाले, देशातील 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन, 60 कोटी लोकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत आहे. काँग्रेसच्या काळात शासकीय योजनांमध्ये कमिशनखोरी मोठी होती. मोदींच्या काळात थेट लाभार्थीच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. 1947 ते 2014 या कालावधीपेक्षा 2014 ते 24 या दहा वर्षांत दुपटीहून अधिक राष्ट्रीय महामार्गांची बांधणी झाली आहे. देशात 150 विमानतळ झाले आहेत. पाच शहरांत मेट्रो होती, आता 20 शहरांत मेट्रो धावत आहे. आयआयटी, आयआयएम, ट्रिपल आयटी, एनआयटी यांसारख्या संस्थांची संख्या 7 होती, ती आता 22 झाली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेचे उपनेते मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजप किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजप पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, सांगली लोकसभा समन्वयक दीपक शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, जनसुराज्य शक्ती पक्ष युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, दिलीप सूर्यवंशी, भाजप महिला आघाडीच्या नीता केळकर, अ‍ॅड. स्वाती शिंदे, भारती दिगडे, भाजप महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे-पाटील, घटकपक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहुल गांधींनी आता इटलीतच राहावे

योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी करीत आहेत. पण जेव्हा जेव्हा देशावर संकट येते, नैसर्गिक आपत्ती येते, त्या-त्यावेळी ते देश सोडून इटलीला जातात. कोरोना संकट असो अथवा भूकंप, महापूर संकटावेळी ते इटलीला गेले. परदेशात जाऊन देशाची निंदा करण्याचा उद्योगही त्यांनी केला. देशाची निंदा जनता सहन करणार नाही. त्यांनी आता देश सोडून इटलीतच राहावे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news