Lok Sabha Election 2024 : लालूंनी केली काँग्रेसची कोंडी | पुढारी

Lok Sabha Election 2024 : लालूंनी केली काँग्रेसची कोंडी

बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एनडीए आणि विरोधी इंडिया आघाडीने जागावाटपावर शिक्कामोर्तब केल्यानंतर हळूहळू प्रचारात रंग भरू लागला आहे. 1999 मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या राजदने यावेळी स्वतःकडे सर्वाधिक जागा घेतल्या असून, त्यामुळे काँगे्रसची कोंडी झाली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच विरोधी आघाडीत धुसफुस सुरू झाल्याचे चित्र दिसून येते.

केंद्रात सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्षाने येत्या लोकसभा निवडणुकीत चारशेहून अधिक जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. त्याचा विचार केला, तर भाजपसाठी बिहार हे महत्त्वाचे राज्य आहे. या ठिकाणी लोकसभेच्या एकूण 40 जागा असून, 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या करिष्मादायी नेतृत्वामुळे एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीने त्यातील तब्बल 39 जागांवर दणदणीत विजय मिळवून विरोधकांचा सुपडासाफ केला होता. यावेळच्या निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. दुसरीकडे भाजप आणि जनता दल संयुक्त (जदयू) या दोन्ही पक्षांची मतांची टक्केवारी वाढत चालल्याचे दिसून येते. 1999 मध्ये राजदला 33.9 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर 2004 मध्ये 30.7 टक्के, 2009 मध्ये 19.3 टक्के, 2014 मध्ये 20.1 आणि 2019 मध्ये 15.4 टक्के मतांवर समाधान मानावे लागल्याचे दिसून येते. राजदची ही आतापर्यंतची सर्वात निराशाजनक कामगिरी आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जदयूने समझोता केला होता. त्यावेळी या दोन्ही पक्षांना 45.4 टक्के, तर 2014 च्या निवडणुकीत मतांची 45.2 टक्केवारी होती. यावेळी नितीशकुमार पुन्हा एनडीएमध्ये आल्यामुळे भाजपचे काम सोपे झाले आहे. अर्थात, राजकीय पक्षांनी आघाड्या केल्या तरी त्यांना जागा जिंकता आल्या, असे घडले नाही. उदाहरण द्यायचे तर गेल्या लोकसभा निवडणुकीत राजदला 15.4 टक्के मते मिळाली होती. मात्र, त्यांची पाटी कोरी राहिली. जदयूला भाजपपेक्षा कमी मते मिळाली, तरी त्यांना 16 जागा मिळाल्या. भाजपने तेव्हा सर्वाधिक म्हणजे 17 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 7.7 टक्के मतांसह केवळ एक जागा जिंकता आली. याच्या उलट लोकजनशक्ती पक्षाला अवघी 7.86 टक्के मते मिळूनही त्यांनी सहा जागांवर विजय मिळवला होता.

काँग्रेसची राजदकडून कोंडी

या राज्यात बरेच चर्वितचर्वण झाल्यानंतर अखेर विरोधी इंडिया आघाडीने जागावाटपावर शिक्कामोर्तब केले. यामध्ये राजदने 26 जागा स्वतःकडे ठेवल्या असून, काँग्रेसला 9 जागा देण्यात आल्या आहेत. याखेरीज डावे पक्ष 5 जागांवर लढतील, असे ठरवण्यात आले आहे. ज्या जागांवर काँग्रेसचा प्रभाव आहे, त्यासुद्धा राजदने स्वतःकडे ठेवल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी केविलवाणी झाली आहे. राजदच्या बाबतीत सांगायचे तर सर्वाधिक जागा मिळूनही त्या पक्षात तिकीट वाटपावरून तीव्र असंतोष उफाळून आला आहे. विरोधी आघाडी वरवर एकत्र दिसत असली, तरी त्यांच्यातील अंतर्विरोध निवडणुकीच्या तोंडावर गडद होत चालला आहे. 1999 मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या राजदने यावेळी सर्वाधिक जागा लढवून एनडीएला आव्हान दिले आहे. मात्र, कोणताही ठोस मुद्दा समोर नसताना हा पक्ष मोदींच्या झंझावातापुढे कसा टिकणार, असा सवाल राजकीय निरीक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. बिहारमध्ये आजच्या घडीला भाजप पहिल्या क्रमांकावर असून, नितीशकुमार यांच्यासोबत जागावाटप झाल्यामुळे दोघांची संयुक्त ताकद आणखी वाढली आहे.

कन्हैयाकुमार, पप्पू यादव यांचा पत्ता कट

लालूप्रसाद यादव यांना आपले चिरंजीव तेजस्वी यांच्या राजकीय भवितव्याची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळेच त्यांनी पाच वेळा लोकसभेची निवडणूक जिंकलेल्या पप्पू यादव यांना धोबीपछाड दिली. त्यांचा पूर्णिया मतदार संघातून राजद आपला उमेदवार उतरवणार आहे. यामुळे पप्पू यादव यांनी काँग्रेसमध्ये रातोरात प्रवेश करून पूर्णियातून राजदला आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, कन्हैयाकुमार यांच्यासाठी बेगुसराय मतदारसंघ आपल्याला मिळावा, अशी काँग्रेसची अपेक्षा होती. त्यालाही राजदने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. गेल्या वेळी तेथून कन्हैयाकुमार भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून लढले होते. तथापि, भाजपने त्यांचा सणसणीत पराभव केला होता. यावेळी पप्पू यादव आणि कन्हैयाकुमार यांना दूर ठेवून तेजस्वी यांना चमकवण्याची चाल लालूप्रसाद खेळले आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजप आणि जदयू यांनी प्रचारातही आघाडी घेतली आहे.

Back to top button