यूपीमध्ये एनडीए जोरात, विरोधी आघाडी कोमात | पुढारी

यूपीमध्ये एनडीए जोरात, विरोधी आघाडी कोमात

- सुनील डोळे

लोकसभा निवडणुकांसाठी उत्तर प्रदेशात पहिल्या आठ जागांवर 19 एप्रिलला मतदान होत असून, भाजपसह एनडीएमधील सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. त्या तुलनेत विरोधी आघाडीवर सामसूम दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मार्च रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे विशाल जाहीर सभेला संबोधित केले. लक्षवेधी बाब म्हणजे या सभेला मुस्लिम समुदायाने प्रचंड गर्दी केली होती. पाठोपाठ सहारनपूर येथेही मोदी यांच्या सभेचे आयोजन असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत सिंह यांनी मुझफ्फरनगर येथे प्रचारसभा घेतल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रिजेश पाठक यांनीही जिल्हानिहाय जाहीर सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. यात ठळकपणे समोर आलेली गोष्ट म्हणजे विरोधी इंडिया आघाडीतील नीरव शांतता.

यावेळी अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील समाजवादी पक्षाने काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. समाजवादी पक्ष सर्वाधिक म्हणजे 63 जागा लढवत आहे, तर काँग्रेसच्या वाट्याला 7 जागा आल्या आहेत. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने ‘एकला चलो रे’ धोरण अवलंबले आहे. निवडणूक तोंडावर आली तरी समाजवादी पक्षात उमेदवारांबद्दल एकमत व्हायला तयार नाही. त्यामुळे अखिलेश यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यांनी अजून एकही प्रचारसभा घेतलेली नाही. या पक्षाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, हास्यास्पद बाब म्हणजे सध्या तुरुंगात असलेले आझम खान यांचेही नाव त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. काँग्रेसला तर या निवडणुकीत काहीच गमवायचे नाही. त्यांचे स्टार प्रचारक म्हणजे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वधेरा. या दोघांच्या सभा उत्तर प्रदेशात केव्हा होणार, याबद्दल कसलीच स्पष्टता नाही. अन्य स्टार प्रचारकांबद्दल काँग्रेसचे स्थानिक नेते अनभिज्ञ आहेत. राहुल गांधी आणि अखिलेश यादव एकत्रितपणे प्रचारसभा घेतील, तेव्हाच विरोधी आघाडीकडून प्रचाराचे वातावरण तयार होईल. पहिल्या टप्प्यासाठी 17 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचार समाप्त होईल. या टप्प्यात सहारनपूर, मुझफ्फरनगर, बागपत, बिजनोर, नगिना, मुरादाबाद, रामपूर आणि पिलीभीत या मतदार संघांत मतदान होत आहे. म्हणजेच प्रचारासाठी अल्प कालावधी उरला आहे.

बहुजन समाज पक्षाने ईदचा सण संपल्यानंतर प्रचाराचा धडाका लावण्याचे ठरविले आहे. मायावती यांनी भाचा आकाश आनंद यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. 14 एप्रिलपासून हे दोघे प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. बसपच्या प्रचारसभा बिजनोर आणि सहारनपूरमध्ये होणार आहेत. म्हणजेच विरोधी नेते जेव्हा प्रचाराला सुरुवात करतील, तोपर्यंत भाजपने आपली बाजू लोकांपर्यंत पोहोचवलेली असेल. विरोधी पक्ष आणि भाजप यांच्यात हाच मूलभूत फरक आहे. उत्तर प्रदेशात तो प्रकर्षाने समोर आला आहे.

भाजपचा नियोजनबद्ध प्रचार

भाजपने जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलासह अपना दल आणि अन्य छोट्या पक्षांना सोबत घेतले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी सत्तरहून अधिक जागा जिंकून आणण्याचा संकल्प केला आहे. ते स्वतः बूथ पातळीपर्यंत काम करणार्‍या सामान्य कार्यकर्त्यांशी जातीने संपर्क ठेवून आहेत. त्यांच्याकडून बारीक-सारीक तपशील जाणून घेऊन त्यांना त्यानुसार मार्गदर्शन करत आहेत. दिल्लीतील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. त्याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. निवडणुकीच्या आधी काही संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार यावेळी गेल्या वेळच्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये 2.13 टक्क्यांची वाढ संभवते. यात सर्वात करुण अवस्था काँग्रेसची झाली आहे. 2019 मध्ये काँग्रेसला 6.36 टक्के मते मिळाली होती. यंदा ही टक्केवारी आणखी कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे गेल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला 18.11 टक्के मते मिळाली होती. यावेळी त्यात आणखी 10 ते 12 टक्क्यांची वाढ होण्याचे संकेत आहेत. काँग्रेसप्रमाणेच बसपच्या मतांमध्ये घट होऊ शकते. गेल्या वेळी बसप 19.4 टक्के मते मिळाली होती. यावेळी ती 8.4 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतात. भाजपने गेल्या वेळी 50 टक्के मतांसह 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या.

आरक्षित जागांचे महत्त्वपूर्ण समीकरण

गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांतून या राज्यात एक वेगळेच समीकरण तयार झाल्याचे दिसून येते. ते असे की, आरक्षित जागा ज्या पक्षाने जास्त प्रमाणात जिंकल्या, त्या पक्षाने केंद्रात सरकार स्थापन केले. गेल्या दोन निवडणुकांत भाजपने यात यश मिळविले. त्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये सप आणि बसपने आरक्षित जागा जिंकल्या, तेव्हा केंद्रात यूपीएचे सरकार स्थापन झाले होते. उत्तराखंडच्या निर्मितीपूर्वी एकत्रित उत्तर प्रदेशात 18 जागा आरक्षित होत्या. उत्तराखंडच्या निर्मितीनंतर त्यातील एक जागा कमी झाली. याचाच अर्थ मोदींच्या जादूई नेतृत्वाखालील भाजपचा जनाधार मागासवर्गीयांतही वेगाने वाढत चालला आहे.

श्रीराम मंदिर, वेगवान आर्थिक प्रगती

भाजपने श्रीराम मंदिराच्या स्थापनेसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा झपाट्याने होत असलेला आर्थिक विकास, मोदींमुळे जागतिक पातळीवर भारताचे उंचावलेले स्थान, समाजातील विविध वर्गांसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजना, महिलांचे सशक्तीकरण, उत्तर प्रदेशातून गुंडगिरीचा होत असलेला नायनाट, राज्यात वाढू लागलेला विदेशी गुंतवणुकीचा ओघ या मुख्य मुद्द्यांभोवती आपला प्रचार केंद्रित ठेवला आहे. याच्या उलट, विरोधकांनी अजून प्रचारालाच सुरुवात केलेली नाही.

Back to top button