उदयनराजेंविरोधात शशिकांत शिंदे? सातार्‍यातून राष्ट्रवादीचाच उमेदवार | पुढारी

उदयनराजेंविरोधात शशिकांत शिंदे? सातार्‍यातून राष्ट्रवादीचाच उमेदवार

हरीष पाटणे

सातारा : पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारीच्या चिन्हावर उतरण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर शरद पवार यांनी सातार्‍याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा निष्ठावंतच लढेल, असा निर्णय घेतला असून, बाळासाहेब पाटील यांच्या नकारानंतर पवारांसाठी त्यांचा हुकमी एक्का शशिकांत शिंदे यांनाच निवडणूक रिंगणात उतरावे लागत आहे. त्यामुळे सातारा लोकसभेची निवडणूूक उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे झाली तर आश्चर्य वाटायला नको.

महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नाव जवळजवळ निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही सातारच्या जागेवरील दावा सोडून दिला आहे. आपल्याला राज्यसभा मिळणार आहे, असे अजितदादांनी सातारच्या आपल्या गटाला कळवले आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने तर सातारच्या जागेवर दावाच केला नाही. त्यामुळे महायुतीकडून उदयनराजेंचे नाव लवकरच जाहीर होईल. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सातार्‍यात झालेल्या बैठकीत तशी घोषणा केली.

त्याचवेळी आम्ही सांगेल त्यांना लढावे लागेल, असे पवार म्हणाले होते. त्यांनी आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, सुनील माने अशी नावे आमच्यासमोर असल्याचेही सांगितले. त्यानंतरच्या दोन दिवसात माजी मुख्यमंत्री आम. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर आले. त्यातच पृथ्वीराज चव्हाण व जयंत पाटील यांची कराडात भेट झाली. या भेटीत दोन नेत्यांमध्ये सविस्तर चर्चाही झाली. पृथ्वीराज चव्हाणांना लोकसभा लढवण्याची इच्छा आहे. मात्र, शरद पवारांच्या तुतारीच्या चिन्हावर लढण्यास त्यांनी नकार दिला. पृथ्वीराज चव्हाण तुतारीवर लढणार असतील तरच महाविकास आघाडीचे ते उमेदवार असतील असे धोरण राष्ट्रवादी शरद पवार गटाने ठरवले. पृथ्वीराज चव्हाणांच्या असमर्थतेनंतर पवारांनी सातारा राष्ट्रवादी काँग्रेसच लढेल, असा निर्णय पत्रकार परिषदेत सांगितला आहे. त्यामुळे सातार्‍याच्या बदल्यात कोणत्याही मतदार संघाची अदलाबदल करण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. पवारांच्यावतीने जयंत पाटील यांनी गेले दोन दिवस आ. बाळासाहेब पाटील व आ. शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली. बाळासाहेब पाटील यांनी कारखान्याचे कारण सांगून लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यावेळी जयंत पाटील यांनी शशिकांत शिंदे यांना तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल, असे सांगितल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसपुढे उदयनराजेंच्याविरोधात शशिकांत शिंदेंशिवाय त्यामुळे दुसरा कोणताच भक्कम पर्याय नसल्याचे समोर येत आहे. पवारांनी आदेश दिला तर लढावे लागेल ही शशिकांत शिंदेंची भूमिका आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात शशिकांत शिंदे निवडणूक रिंगणात दिसण्याची शक्यता जास्त आहे. एक-दोन दिवसात याबाबतचे चित्र निश्चित होईल.

श्रीनिवास पाटील लढणार नाहीत, ही पवारांची गुगली तर नव्हे!

शरद पवारांच्या सर्व्हेमध्ये श्रीनिवास पाटील यांचे नाव एक नंबरला आहे. श्रीनिवास पाटील यांच्या चेहर्‍यावर कुठेही आजारपण दिसत नाही. असे असताना बैठकीत शरद पवारांनी अचानकपणे, श्रीनिवास पाटील आजारी आहेत; त्यामुळे ते निवडणूक लढणार नाहीत, असे जाहीर केले तेव्हा अनेकांना मोठा धक्का बसला. अचानकपणे श्रीनिवास पाटील यांच्या बाजूने रिल्स तयार होऊ लागल्या. त्यांनी केलेल्या कामांचा लेखा-जोखा सोशल मीडियावर वाहू लागला. एवढेच नव्हे, तर श्रीनिवास पाटलांनी लढावे म्हणून जोरबैठकाही सुरू झाल्या. श्रीनिवास पाटील यांनी तर कराडात दमदार भाषण केले. एवढेच नव्हे, तर मंगळवारी रात्री कोरेगावच्या सभेत न दमता आक्रमक बॅटिंग केली. पावसाच्या सभेप्रमाणे श्रीनिवास पाटील गेल्या दोन दिवसांपासून बैठका, मेळाव्यांमध्ये बरसत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या शक्यता व्यक्त होत आहेत. श्रीनिवास पाटील यांच्याबाबत सहानुभूतीचे वातावरण तयार करून त्यांच्याविषयीचे जनमत आणखी वाढवण्याची ती पवारांची गुगली तर नाही ना? अशी शंका त्यामुळे सातारा लोकसभा मतदार संघात उपस्थित होत आहे. ऐनवेळी शरद पवार ही तर माझी खेळी होती, असे म्हणून श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी अर्ज भरायला लावतील, असेही राजकीय जाणकार बोलत आहेत. शरद पवारांचे धक्कातंत्र व आजवरच्या खेळ्या पाहता, समोरच्या विरोधकाला पत्ता लागू न देण्याची ही त्यांची खेळी तर नव्हे ना? अशीही चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

Back to top button