Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे ‘एक तीर दो निशाने’ | पुढारी

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे ‘एक तीर दो निशाने’

संजय सूर्यवंशी

काँग्रेसने एक बरे केले की, जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांच्या मुलांना तिकिटे देऊन टाकली. यातील एका मंत्र्याच्या मुलाला तिकीट दिले असते अन् दुसर्‍याला नाकारले असते, तर पाडापाडीचे अन् कुरघोडीचे राजकारण निश्चितच सुरू झाले असते. दोन्ही मंत्री एकमेकांच्या मतदारसंघात नकारात्मकता न पसरवता आपले पाल्य कसे निवडून येईल, यावर लक्ष केंद्रित करतील. त्यामुळे हायकमांड एका तीरमध्ये दोन्ही निशाणे साधत जबाबदारी दोघांवर ढकलून मोकळे झाले आहे.

काँग्रेस असो वा भाजप, तिकीट जाहीर होण्यापूर्वी एक उत्सुकता होती की ते कोणाला मिळणार. पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे आपली मुलगी प्रियांका यांच्यासाठी अन् महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या मुलगा मृणाल हेब्बाळकर यांना तिकीट मिळावे, यासाठी आधीपासून प्रयत्न करत होते. परंतु, माध्यमांशी बोलताना मात्र पक्ष ज्याला तिकीट देईल त्याला निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करू, हेच सांगत होते. मात्र, दोन्ही मंत्री आपल्या मुलांना तिकीट मिळावे, याच प्रयत्नात होते. ही बाब वर्षभरापासून लपून राहिलेली नव्हती. आता तिकीट जाहीर झाल्यानंतर याची निश्चितच प्रचिती येते.

काँग्रेसला सध्या कर्नाटकातून सर्वाधिक खासदार निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे केंद्रातील अन् राज्यातील काँग्रेस हायकमांडला अधिक जोखीम घ्यायची नव्हती. याचा विचार करून अखेरच्या टप्प्यात त्यांनी दोन्ही मंत्र्यांच्या मुलांना तिकीट जाहीर करत आपली चाणक्यनीती दाखवून दिली आहे. त्यामागे कारणे देखील तशीच आहेत. मंत्री सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात जरी वरवरचे सख्य वाटत असले, तरी अंतर्गत हे दोन्ही नेते एकमेकांना शह-काटशह देण्यासाठी सदैव तत्पर असतात. मंत्री हेब्बाळकरांच्या मुलाला तिकीट मिळून जारकीहोळींच्या मुलीला तिकीट हुकले असते, तर जारकीहोळी कदापि शांत बसले नसते. याच्या उलट जरी झाले असते, तरी लक्ष्मी हेब्बाळकर शांत बसल्या नसत्या. याची परिपूर्ण कल्पना राज्यातील नेतृत्वाला निश्चितच आहे. त्यामुळेच त्यांनी एकाच्या मुलाला तिकीट देऊन दुसर्‍याला नाकारले नाही. याचा परिणाम असा होईल की, दोन्ही नेते आता आपापल्या मतदार संघात आपले पाल्य कसे निवडून येईल, यावर लक्ष केंद्रित करतील. दोन्ही नेते बेळगाव अन् चिकोडी मतदार संघात एकमेकांच्या प्रचाराला जातील, निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील. त्यामुळे कुरघोडीचे अन् पाडापाडीचे राजकारण होणार नाही, हे निश्चित. काँग्रेसने तिकीट देताना दोन्ही नेत्यांना तुमचे तुम्ही बघून घ्या, असे म्हणत त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे एका तीरमध्ये दोन्ही निशाणे कसे लागतील, याची पुरेपूर काळजी पक्षाने घेतली आहे.

नेमके याच्या उलट बेळगाव लोकसभा मतदार संघात भाजपमध्ये झाले आहे. आयात उमेदवार नको म्हणून आधीपासूनच जगदीश शेट्टर यांना विरोध होता. परंतु, भाजप हायकमांडने तोच उमेदवार लादल्याची भावना स्थानिक भाजप नेत्यांची बनली आहे. त्यामुळे येडियुराप्पांसह भाजप नेते प्रचार करत असले, तरी ते मनापासून शेट्टर यांच्यासोबत किती राहतात, हे पाहावे लागणार आहे. मतदार संघातील समस्या घेऊन हुबळीला जाणार का, हा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांचा प्रश्न रास्तच आहे आणि मतदारांनाही तो रास्त वाटला तर शेट्टर यांची वाट बिकटच होणार आहे. त्यांना केंद्रातील मोदींचा करिष्माच वाचवू शकेल. चिकोडी मतदार संघातून अण्णासाहेब जोल्लेंची उमेदवारी अपेक्षितच होती. त्यामुळे त्यांना पालकमंत्र्यांची लेक कितपत टक्कर देते, हे पाहावे लागणार आहे. परंतु, काँग्रेसमधील दोन्ही मंत्र्यांच्या मुलांना उमेदवारी, विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे आमदारबळ अधिक असल्याने सध्या तरी काँग्रेससाठी वातावरण अधिक पूरक आहे, असे म्हणायला हरकत नाही.

जबाबदारी परस्परांच्या मतदार संघांची

काँग्रेसने बेळगाव जिल्ल्ह्यातील बेळगाव आणि चिकोडी या दोन मतदार संघांत दोन्ही मंत्र्यांच्या मुलांना तिकीट देताना एक खेळी केली आहे. चिकोडी मतदार संघाचे प्रभारी पद मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना दिले आहे; तर बेळगाव मतदार संघाचे प्रभारी पद पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावर सोपवले आहे. म्हणजेच त्यांची मुले ज्या मतदार संघांतून लढत आहेत, तो मतदारसंघ त्यांच्याकडे न देता परस्परांचा मतदारसंघ सोपवण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांनी आपली प्रभारीपदाची जबाबदारी 100 टक्के पार पाडावी, हे यामागचे गणित आहे.

Back to top button