Lok Sabha Election 2024 : मराठी-अमराठी लढाई! आघाडीचे भाजपसमोर मोठे आव्हान | पुढारी

Lok Sabha Election 2024 : मराठी-अमराठी लढाई! आघाडीचे भाजपसमोर मोठे आव्हान

राजेश सावंत

उत्तर पूर्व मुंबई : उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपने अंतर्गत वादामुळे विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट करत, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या खास मर्जीतील आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी बहाल केली. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या संधीचा फायदा घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीने माजी खासदार संजय दिना पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

पाटील यांच्या या उमेदवारीमुळे या लोकसभा मतदारसंघात मराठी व अमराठी लढाई रंगणार आहे. तसा हा मतदारसंघ सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्लाच राहिला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत 1998 व 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले होते. 1998 मध्ये कामत यांनी भाजप नेते दिवंगत प्रमोद महाजन यांचा पराभव केला होता. 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे किरीट सोमय्या विजयी झाले होते; तर 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांनी किरीट सोमय्या यांचा पराभव केला होता. यावेळी बहुतांश म्हणजेच एक लाख 95 हजार मराठी मते मनसेचे उमेदवार शिशिर शिंदे यांच्या बाजूने गेली होती. याचा फटका सोमय्या यांना बसला. 2014 मध्ये पुन्हा किरीट सोमय्या 3 लाख पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले. मात्र 2019 मध्ये सोमय्या यांचा पत्ता कट करत नगरसेवक असलेल्या मनोज कोटक यांना उमेदवारी दिली होती. यात कोटक यांनी बाजी मारली. गेल्या पाच वर्षांत कोटक यांनी आपले वर्चस्व निर्माण केले. अगदी ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांचे सलोख्याचे संबंध असल्यामुळे कोटक यांची उमेदवारी महाविकास आघाडीसाठी काही प्रमाणात वरचढ चढली असती. पण भाजपने केवळ मुंबई भाजपतील अंतर्गत वादामुळे कोटक यांचा पत्ता कट केला. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी नसतानाही केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर संजय दिना पाटील विजयी झाले होते. आता तर पाटील ठाकरे गटात असून त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचाही पाठिंबा आहे. त्यात पाटील यांना मानखुर्द विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. ते स्वतः भांडुप परिसरातील भूमिपुत्र आहेत.

या मतदारसंघात भांडुप कांजूर विक्रोळी घाटकोपर पश्चिम हे विभागात सर्वाधिक मराठी लोकवस्ती असल्यामुळे याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. त्यात भाजपने अमराठी उमेदवार दिल्यामुळे मराठी मते एकवटली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षांपासून सलग भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीच्या हातात जाऊ नये, यासाठी भाजपचे मुंबईतील वरिष्ठ नेत्यांसह स्वतः विद्यमान खासदार मनोज कोटक वस्त्यांमध्ये फिरू लागले आहेत. राज ठाकरे भाजपसोबत गेले तर काही मराठी मते भाजपकडे फिरू शकतात. काही महिन्यांपूर्वी मुलुंडमध्ये मराठी कुटुंबाला घर नाकारल्यामुळे या परिसरात मराठी व गुजराती वाद रंगला होता. गुजराती समाजाबद्दल असलेली नाराजी मराठी माणसांमध्ये मुलुंड घाटकोपर पूर्व व घाटकोपर पश्चिम या विधानसभेमध्ये भाजपचे आमदार आहेत तर भांडुप व विक्रोळी या दोन मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत; तर मानखुर्द विधानसभेमध्ये समाजवादी पार्टीचा आमदार आहे. विधानसभानिहाय तुलना केल्यास भाजपसाठी लाभदायक दिसते.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे मनोज कोटक विजयी झाले असले तरी संजय दिना पाटील यांचे मतदान 7.54 टक्क्यांनी वाढले होते; तर भाजपचे मतदान4.34 टक्क्यांनी कमी झाले होते. यावेळी भाजपसोबत ठाकरे सेना नसल्यामुळे भाजपच्या मतावर परिणाम होऊ शकतो. 2019 मध्ये मनोज कोटक यांनी 5 लाख 14 हजार मते घेतली होती; तर संजय दिना पाटील यांना सुमारे दोन लाख 88 हजार मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीनेही 68 हजार मते घेतली होती.

मराठी लोकवस्ती : मुलुंड पूर्व, भांडुप पूर्व-पश्चिम, कांजूर गाव, विक्रोळी घाटकोपर पश्चिम
गुजराती लोकवस्ती : मुलुंड पश्चिम,
घाटकोपर पूर्व
मुस्लिम लोकवस्ती : गोवंडी,
शिवाजीनगर, मानखुर्द,

Back to top button