Lok Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्र्यांंसह मंत्र्यांची मुले भिडणार | पुढारी

Lok Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्र्यांंसह मंत्र्यांची मुले भिडणार

कर्नाटक : लक्षवेधी लढती

एकूण 28 पैकी तब्बल 25 जागा जिंकलेल्या राज्यात भाजपसमोर विरोधी पक्ष तगडे आव्हान उभे करू शकतील का? इतर कोणते राज्य असते तर कठीण होते. पण कर्नाटकात यंदा स्थिती थोडी वेगळी आहे. पहिले कारण म्हणजे यावेळी राज्य सरकार काँग्रेसचे आहे आणि दुसरे कारण म्हणजे भाजपला बंडाळीचा धोका आहे. काँग्रेसने मंत्र्यांच्या मुलांना-नातेवाईकांना पाच मतदारसंघात उभे केले आहे, हेही एक कारण. अशा वातावरणात कोणत्या लढती लक्षवेधी ठरतील, यावर दृष्टिक्षेप.

भाजप आणि देवेगौडा यांच्या निधर्मी जनता दलमध्ये युती झाल्याने कर्नाटकात दुरंगी लढती होतील. बेळगाव, चिकोडी, बागलकोट, बिदर, बंगळूर दक्षिण अशा पाच मतदार संघांत मंत्र्यांची मुले रिंगणात आहेत. यासह उडुपी-चिक्कमगळूर, बंगळूर ग्रामीण, म्हैसूर येथील लढती लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

बेळगावातून महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना भाजपकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. पण, स्थानिक नेत्यांचा त्यास विरोध आहे. स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे अजूनही भाजपचा उमेदवार निश्चित झालेला नाही. चिकोडीतून भाजपतर्फे खासदार अण्णासाहेब जोल्लेंना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची मुलगी प्रियांका यांना उमेदवारी दिली आहे. बेळगावचे हे दोन्ही मतदारसंघ सध्या भाजपकडे आहेत. दोन मंत्र्यांच्या मुलांना रिंगणात उतरवून ते भाजपकडून खेचून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे.

कारवारमधून माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. याआधी त्या खानापूरच्या आमदार होत्या. त्यामुळे त्यांना हा परिसर नवा नाही. त्यांच्याविरुद्ध भाजप विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे यांना पुन्हा उमेदवारी देण्याच्या मानसिकतेत नाही. भाजपला 400 जागा द्या, संविधान बदलायचे आहे, हे वक्तव्य केल्यामुळे अनंतकुमार यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचे नियोजन भाजप करत आहे. तसे झाल्यास माजी सभापती विश्वेश्वर हेगडे-कागेरी इथून भाजपकडून लढतील. बागलकोटमधून भाजपचे पी. सी. गद्दिगौडर पुन्हा रिंगणात असून मंत्री शिवानंद पाटील यांची मुलगी संयुक्ता यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
उमेदवारीसाठी इच्छुक असणार्‍या वीणा काशप्पनवर यांचे मतदार संघात वर्चस्व आहे. त्यांनी बंडखोरी केल्यास काँग्रेसची अडचण होणार आहे. बंगळूर दक्षिणमध्ये विद्यमान खासदार तेजस्वी सूर्या यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने मंत्री रामलिंगा रेड्डी यांची मुलगी सौम्या यांना उतरविले आहे.

उडुपी-चिक्कमगळूर येथून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोटा श्रीनिवास पुजारी भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरुद्ध जातनिहाय गणतीसाठी नेमलेल्या आयोगाचे अध्यक्ष जयप्रकाश हेगडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. इथून विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजेंना विरोध झाल्याने त्यांना बंगळूर उत्तरमधून भाजपने उमेदवारी दिली आहे. पण बंगळूर उत्तरमधूनही करंदलाजे यांना विरोध होत असल्याने दोन्ही मतदार संघात रंजक चित्र दिसते. शिमोगातून काँग्रेसने अभिनेते शिवराजकुमार यांच्या पत्नी व शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांची बहीण गीता शिवराजकुमार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याविरुद्ध माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार बी. वाय. राघवेंद्र भाजपचे उमेदवार आहेत. ही लढत चुरशीची ठरेल, ती माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी भाजपविरुद्ध बंडखोरी केली तर. आपल्या मुलाला उमेदवारी न मिळाल्याने भाजपचा हा बिनीचा शिलेदार अपक्ष लढण्याची तयारी करतो आहे.

बंगळूर ग्रामीणमधून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि लोकप्रिय डॉ. मंजुनाथ भाजपतर्फे रिंगणात आहेत. सुरेश हे मावळत्या लोकसभेतील कर्नाटकचे एकमेव काँग्रेस खासदार. त्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष असेल. म्हैसूरमधून राजघराण्याचे वंशज यदुवीर वडेयर भाजपचे उमेदवार आहेत. 1991 नंतर प्रथमच राजघराण्यातील व्यक्ती रिंगणात असल्याने ही लढत आतापासूनच लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. हावेरीमधून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई भाजपकडून रिंगणात आहेत. मंड्यामधून अभिनेत्री सुमलता पुन्हा लढतील. तर सोनिया गांधी विरुद्ध सुषमा स्वराज या लढतीमुळे आणि खाण सम्राट रेड्डी बंधूंमुळे राष्ट्रस्तरावर पोहोचलेल्या बळ्ळारीतून अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही. पण या लढतीकडेही देशाचे लक्ष असेल.

Back to top button