Lok Sabha Election 2024 | सोलापूर आणि माढ्यात ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला | पुढारी

Lok Sabha Election 2024 | सोलापूर आणि माढ्यात 'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

संजय पाठक, सोलापूर

देशपातळीवरील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे सोलापूर आणि माढा हे दोन लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. या दिग्गज नेत्यांमध्ये प्राधान्याने केंद्रीय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघात सुशीलकुमार शिंदे यांनी दोनदा पराभव स्वीकारल्यानंतर आपली कन्या तथा सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार प्रणिती यांना उमेदवार म्हणून पुढे केले आहे. केंद्रात आणि राज्यात अनेक अधिकारपदे भूषवलेल्या शिंदे यांनी प्रणिती यांच्या विजयासाठी छोट्या गावांपर्यंत पायपीट सुरू केली आहे. त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे कन्येच्या विजयासाठी ते जातीने कामाला लागले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. या मतदार संघातून खुद्द पवार यांनी विजय मिळवला होता. यंदाही त्यांनीच येथून निवडणूक लढवावी, असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मात्र, पवार यांनी त्यास नम्र नकार दिला आहे. त्यांनी स्वतःला निवडणुकीच्या धबडग्यापासून दूर ठेवणे पसंत केले आहे. त्याऐवजी या मतदार संघातून विजय कसा मिळवायचा, याचे आडाखे बांधण्यात ते सध्या मग्न आहेत. या मतदार संघातून भाजपने पुन्हा एकदा रणजीत नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय प्राप्त केला होता. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा त्यांची वर्णी लागल्याचे दिसून येते. यावेळीही ते आपल्या विजयाबद्दल ठाम असल्याचे दिसून येते. या मतदार संघातील मातब्बर राजकीय घराणी अनुक्रमे अकलूजचे मोहिते-पाटील आणि फलटणचे रामराजे नाईक -निंबाळकर नाराज झाल्याचे चित्र दिसते. भाजपमधील या नाराजीचा फायदा घेण्यासाठी शरद पवार योग्य संधीची वाट पहात आहेत. यादरम्यान त्यांनी मोहिते-पाटील आणि रामराजे निंबाळकरांना चुचकारण्याची एकही संधी सोडलेली नाही. यामुळे हा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केल्याचे दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी होणारी लढत लक्षवेधी ठरेल, यात शंका नाही. घोडामैदान जवळच आहे.

Back to top button