Lok Sabha elections 2024 | पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा, NEET परीक्षेवर बंदी, DMKचा जाहीरनामा प्रसिद्ध | पुढारी

Lok Sabha elections 2024 | पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा, NEET परीक्षेवर बंदी, DMKचा जाहीरनामा प्रसिद्ध

पुढारी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections 2024) तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बुधवारी (दि.२०) त्यांच्या डीएमके पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. याशिवाय लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादीही त्यांनी जाहीर केली. पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा आणि नीट (NEET) परीक्षेवर बंदी अशी आश्वासने DMK ने त्यांच्या जाहीरनाम्यातून दिली आहेत. चेन्नईत झालेल्या या कार्यक्रमाला खासदार आणि स्टॅलिन यांची बहीण कनिमोझी आणि पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते.

पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले, “डीएमके निवडणुकीपूर्वी जाहीरनामा तयार करते. आम्ही जे आश्वासन देतो ते पूर्ण करतो. आमच्या नेत्यांनी आम्हाला हेच शिकवले आहे. द्रविडीयन मॉडेल अंतर्गत ज्या योजना राबविण्यात आल्या त्या तमिळनाडूच्या हितासाठी आहेत. त्या योजना भारतभर नेल्या जातील.”

स्टॅलिन यांनी यावेळी त्यांची बहीण कनिमोझी यांचे कौतुक केले. ते म्हणाले, “कनिमोझींनी प्रत्येक जिल्ह्यासाठीच्या योजनांवर लक्ष केंद्रित करणारा एक अद्भुत जाहीरनामा तयार केला आहे.” त्यांनी प्रमुख गोष्टींवरही त्यात प्रकाश टाकला आहे. ”हा केवळ द्रमुकचा जाहीरनामा नाही तर जनतेचा जाहीरनामा आहे.” असेही स्टॅलिन यांनी नमूद केले.

राज्यांना संघराज्य अधिकार देण्यासाठी भारतीय संविधानात बदल करणे, चेन्नई येथे सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ, पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) मागे घेण्यात येईल. महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्यात येईल. सरकारी शाळांमध्ये सकाळच्या जेवणाची योजना, NEET वर बंदी घालण्यात येईल. नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA) हटवणे आदी प्रमुखे आश्वासने डीएमके पक्षाने जाहीरनाम्यातून दिली आहेत.

‘राज्यपालांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलतीनंतर  करावी’

द्रमुकने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात राज्यपालांच्या नियुक्तीच्या मुद्याचाही समावेश केला आहे. जोपर्यंत राज्यपालांचे पद रद्द होत नाही तोपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करून राज्यासाठी राज्यपाल नियुक्त करावा, असे डीएमकेने जाहीरनाम्यात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तामिळनाडू दौऱ्यावर एम. के. स्टॅलिन म्हणाले की, तामिळनाडूमध्ये आलेल्या पुराच्या वेळी पंतप्रधान मोदी आले असते तर मला आनंद झाला असता. (Lok Sabha elections 2024)

हे ही वाचा :

Back to top button