

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियात आज ( दि. १६ ऑक्टोबर) टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी दोन सामने झाले. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नामिबियाने श्रीलंकेचा पराभव केला. तर, दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सने यूएईचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यादरम्यान नेदरलँडच्या एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचे नाव लोगान व्हॅन बीक (Logan van Beek) असे आहे. हा खेळाडू आहे तरी कोण जाणून घेऊयात…
लोगान व्हॅन बीक गेल्या महिन्यात भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड 'अ' संघाचा सदस्य होता. २७ सप्टेंबर रोजी तो भारत 'अ' विरुद्ध सामनाही खेळला होता. त्यावेळी हा खेळाडू टी-२० विश्वचषक स्पर्धेच खेळेल याची कल्पनाही कुणाला नव्हती; पण न्यूझीलंड संघाकडून नाही तर, नेदरलँडकडून खेळण्यासाठी लोगान व्हॅन बीक मैदानात उतरला. त्याने सामन्यात यूएईविरुद्ध गोलंदाजी करताना दोन षटकांत १९ धावा दिल्या.
लोगन व्हॅन बीक हा २००९ च्या जागतिक अंडर- १९ बास्केटबॉल स्पर्धेतन्यूझीलंडच्या संघाकडून खेळला. याशिवाय फावल्या वेळात त्याने क्रीडा प्रशिक्षक म्हणूनही काम केले. ताे माजी क्रिकेटपटू सॅमी गिलेन यांचा नातू आहे. सॅमी गिलेन वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांसाठी कसोटी क्रिकेट खेळले आहेत.
व्हॅन बीक २०१० मध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेमध्ये न्यूझीलंड संघाचा सदस्य होता. यानंतर, २०१४ मध्ये, त्याने टी-२० विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सकडून पदार्पण केले. त्याने पहिला सामना १४ मार्च २०१४ साली यूएई विरुद्ध खेळला होता. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात चांगली झाली नाही. सहा सामन्यांत खेळलेल्या सामन्यात त्याने फक्त दोन विकेट घेतल्या आणि फक्त तीन धावा केल्या. सातव्या सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध नऊ धावांत तीन बळी घेतले. नेदरलँड्सने हा सामना ४५ धावांनी जिंकला. व्हॅन बीकने यावर्षी न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळले. त्यानंतर त्याच देशाच्या 'अ' संघाकडूनही खेळला.
क्राइस्टचर्चमध्ये जन्मलेल्या २३ वर्षीय व्हॅन बीकचे वडील नेदरलँडचे असल्यामुळे त्यांला तिथे खेळण्याची परवानगी मिळाली. त्याने १७ वनडेत २२ विकेट घेतल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर २६२ धावा आहेत. त्याचबरोबर टी-२० मध्ये व्हॅन बीकने १७ सामन्यात १८ विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा;