पुणे: पिफमधील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी जाहीर

पुणे: पिफमधील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी जाहीर
Published on
Updated on

पुणे: पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी आज झालेल्या पत्रकार परिषदेत फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जाहीर केली. याबरोबरच विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमालेत यावर्षी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांचे 'लेसन्स आय हॅव लर्न्ट सो फार' या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता हे देखील या वेळी उपस्थित होते.

यंदा २ ते ९ फेब्रुवारी, २०२३ दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून मुकुंदनगर येथील थिएटर अकादमी, सकल ललित कलाघर या ठिकाणी २ फेब्रुवारी रोजी सायं ५.३० वाजता महोत्सवाचा उद्घाटन समारंभ तर ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता महोत्सवाचा समारोप समारंभ संपन्न होईल, असेही डॉ. पटेल यांनी सांगितले.

अली अब्बासी दिग्दर्शित 'होली स्पायडर' या वर्षीची 'ओपनिंग फिल्म' म्हणून तर दिग्दर्शक मिशेल हाजानाविसियस यांची 'फायनल कट' ही फिल्म 'क्लोजिंग फिल्म' म्हणून दाखविण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, "काही तांत्रिक कारणामुळे यावर्षी लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या ठिकाणी महोत्सवातील चित्रपट दाखविण्यात येणार नाहीत. त्या ऐवजी कॅम्प परिसरातील आयनॉक्स या ठिकाणी आणखी एक स्कीन वाढविण्यात आली आहे."

यावर्षीच्या पिफमध्ये स्पर्धात्मक विभागात निवड झालेले मराठी चित्रपट पुढीलप्रमाणे –

मदार (दिग्दर्शक – मंगेश बदार)
ग्लोबल आडगांव (दिग्दर्शक – अनिल कुमार साळवे)
गिरकी (दिग्दर्शक – कविता दातीर आणि अमित सोनावणे)
टेरेटरी (दिग्दर्शक – सचिन श्रीराम मुल्लेम्वार)
डायरी ऑफ विनायक पंडित (दिग्दर्शक – मयूर शाम करंबळीकर)
धर्मवीर; मुक्कम पोस्ट ठाणे (दिग्दर्शक – प्रवीण विठ्ठल तरडे)
पंचक (दिग्दर्शक – जयंत जठार आणि राहुल आवटे)

२१ व्या पिफ अंतर्गत होणारी व्याख्याने व कार्यशाळा पुढीलप्रमाणे –

– ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता ए श्रीकर प्रसाद यांचे 'दी इंव्हिजिबल आर्ट ऑफ फिल्म एडिटिंग' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान होईल.

– ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता चैतन्य ताम्हाणे हे विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत 'लेसन्स आय हॅव लर्न्ट सो फार' या विषयावर मार्गदर्शन करतील.

– ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफर शाजी करून हे 'थिंकिंग इमेजेस' याविषयावर मार्गदर्शन करतील.

– ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता 'अर्जुन पंडित', 'और प्यार हो गया', 'अंजाम', 'जो बोले सो निहाल' यांसारख्या चित्रपटांचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल यांचा 'मेनस्ट्रीम सिनेमा टूडे' या विषयावर मास्टरक्लास होईल. याबरोबरच 'राज कपूर: दी मास्टर अॅट वर्क' या पुस्तकाचे प्रकाशन देखील पार पडेल.

– ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर हे 'ह्युमर इन सिनेमा' याविषयावर आपले विचार मांडतील.

– ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता ज्येष्ठ दिग्दर्शिका अरुणा राजे व टाटा इन्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसच्या स्कूल ऑफ मिडीया अँड कल्चरल स्टडीज विभागाच्या प्रमुख प्रोफेसर डॉ. लक्ष्मी लिंगम या दोघी 'मेकिंग फिल्म्स अँड वॉचिंग फिल्म्स: जेंडर इन हिंदी सिनेमा' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करतील. यानंतर सायंकाळी ४.३० वाजता सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन या 'चॅलेंजेस ऑफ फिमेल अॅक्टर्स इन दी एन्टरटेन्मेट वर्ल्ड' या विषयावर आपले मत मांडतील.

२१ व्या पिफ अंतर्गत होणारी व्याख्याने व कार्यशाळा या सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन या ठिकाणी पार पडतील. सदर कार्यक्रमांसाठी वेगळ्या नोंदणीची गरज नसून पिफसाठी नोंदणी केलेल्या कार्डवर यासाठी प्रेक्षकांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news