Lionel Messi : लियोनेल मेस्सी वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू

लियोनेल मेस्सी
लियोनेल मेस्सी
Published on
Updated on

पॅरिस, वृत्तसंस्था : अर्जेंटिनाचा विश्वचषक विजेता कर्णधार लियोनेल मेस्सी लॉरियसचा वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रीडापटू ठरला तर स्प्रिंट चॅम्पियन शेली-अ‍ॅन फ्रेजर-प्राईस ही वर्षातील सर्वोत्तम महिला क्रीडापटू ठरली. मेस्सीला अर्जेंटिना फुटबॉल संघाच्या वतीने सर्वोत्तम जागतिक संघ म्हणून सन्मानित करण्यात आले. कतारमध्ये संपन्न झालेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाने झळाळत्या चषकावर आपले नाव कोरले आहे. त्या कामगिरीची दखल घेत अर्जेंटिनाचा हा गौरव करण्यात आला.

क्लब स्तरावर पीएसजीचे प्रतिनिधित्व करत असलेल्या 35 वर्षीय मेस्सीने यापूर्वीही हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकला असून 2020 मध्ये फॉर्म्युला वन ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनसह तो या पुरस्काराचा संयुक्त मानकरी ठरला होता. सर्वोत्तम क्रीडापटू व सर्वोत्तम जागतिक संघ असे दोन्ही पुरस्कार एकाच वर्षात पटकावणारा मेस्सी असा पराक्रम करणारा पहिला अ‍ॅथलिट ठरला.

महिला गटात लॉरियस पुरस्काराची मानकरी ठरलेल्या जमैकाची फ्रेजर-प्राईस हिच्यासाठी 2022 चे वर्ष अव्वल यश देणारे ठरले. तिने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर्सचे सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम गाजवला. 2022 अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम विजेत्या टेनिसपटू कार्लोस अल्कारेझने एटीपी मानांकनातही अव्वल स्थान मिळवले असून त्याला लॉरियस वर्ल्ड ब्रेकथ्रू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हृदयविकाराच्या धक्क्यातून सावरत प्रथम ब्रेन्टफोर्डकडून व नंतर मँचेस्टर युनायटेडकडून प्रीमियर लीग स्पर्धेत व नंतर डेन्मार्ककडून विश्वचषक स्पर्धेत खेळणार्‍या ख्रिस्तियन एरिक्सनला सर्वोत्तम पुनरागमनवीराचा पुरस्कार लाभला. लॉरियस विश्व पुरस्कारांचे नामांकन जगभरातील प्रसारमाध्यमांची मते आजमावून त्यातून निश्चित केले जाते आणि अंतिम पुरस्कार जेत्यांची निवड लॉरियस वर्ल्ड स्पोर्टस् अकादमीच्या 71 सदस्यांमार्फत केली जाते. हा पुरस्कार 2000 पासून दरवर्षी प्रदान केला जातो.

चषक विजेत्यांचा तपशील

वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रीडापटू : लियोनेल मेस्सी
वर्षातील सर्वोत्तम महिला क्रीडापटू : शेली-अ‍ॅन फ्रेजर-प्राईस
वर्षातील सर्वोत्तम जागतिक संघ : अर्जेंटनाचा पुरुष फुटबॉल संघ
वर्षातील सर्वोत्तम ब्रेकथ्रू : कार्लोस अल्कारेझ
वर्षातील सर्वोत्तम पुनरागमनवीर : ख्रिस्तियन एरिक्सन
वर्षातील सर्वोत्तम दिव्यांग क्रीडापटू : कॅथरिन डेब्रनर
वर्षातील सर्वोत्तम साहसी क्रीडापटू : एलिन गू
लॉरियस स्पोर्ट फॉर गुड अवॉर्ड : टीम अप.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news