

‘पवित्र रिश्ता’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी नुकत्याच अंकिता लोखंडेच्या यूट्यूब चॅनेलवरील एका मुलाखतीमध्ये आपली एकाकी जीवनशैली आणि त्यातून येणाऱ्या भीतीबाबत मोकळेपणाने सांगितले. ७९ वर्षांच्या उषाताईंनी गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत एकटं राहण्याचा निर्णय घेतला असला तरी आता वय वाढल्यानंतर त्यांना एकटेपणाची झळ अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे.
घरी एकटी असते ना… भीती वाटते की मी पडले तर कुणालाही कळणार नाही,” असं भावनिक वक्तव्य करत त्यांनी आपल्या अंतर्मनातील असुरक्षिततेला वाचा फोडली. गेल्या वर्षी ३० जूनला त्यांच्या भावाचा निधन झाल्यानंतर त्यांच्या भावनिक आधाराचा आधारही हरपला, असं त्यांनी सांगितलं.
“माझा भाऊ असता, तर मला काही झालं असतं तर तो धावत आला असता. आता कुणाला सांगू?” असं म्हणत उषाताई भावूक झाल्या.
या क्षणी अंकिता लोखंडे आणि तिचे पती विकी जैन अत्यंत समजूतदारपणे त्यांचं ऐकत होते. अंकिताने सांगितलं, “आई खूप स्ट्रॉंग आहे. ती एकटी राहते. मी खूप वर्षं आईला एकटी राहताना पाहिलं आहे.”
कॅडबॅम्स हॉस्पिटलच्या वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ नेहा कडबॅम यांच्या मते, वृद्ध वयात एकटे राहणाऱ्यांमध्ये भीती, चिंता, वैफल्य आणि अपघातांची भीती सामान्य आहे. “पडण्याची भीती ही केवळ शारीरिक नाही, तर मानसिकदृष्ट्याही खोलवर असते ‘माझं काही झालं, तर कोणालाही कळेल का?’ ही कल्पना अस्वस्थ करणारी असते,” असं त्या म्हणतात.
यावर उपाय काय असू शकतात?
घराबाहेर व आत सुरक्षेची व्यवस्था: आपत्कालीन अलार्म यंत्रणा, घालता येणारी हेल्थ अलर्ट डिव्हाइसेस
घरात साधे बदल: अँटी-स्लिप टाइल्स, ग्रॅब बार्स, चांगली प्रकाशव्यवस्था
सामाजिक जोड टिकवणं: शेजाऱ्यांशी संवाद, कुटुंबाशी नियमित फोन किंवा व्हिडिओ कॉल
भावनिक स्वास्थ्यासाठी संवाद: दुःख, शोक, एकटेपणाबद्दल मोकळेपणाने बोलणे
नेहा कडबॅम सांगतात, “स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार वृद्ध व्यक्तींना मिळावा. स्वावलंबन आणि सुरक्षितता हे दोन्ही शक्य आहेत, योग्य तंत्रज्ञान, सामाजिक मदत व मानसिक आधारामुळे.”