

चहा आणि बिस्किट हा अनेक घरांमध्ये रोजचा चहा–नाश्ता मानला जातो. सकाळी झोपेतून उठल्यानंतर गरमागरम चहा आणि सोबत कुरकुरीत बिस्किट हे कॉम्बिनेशन अनेकांना आवडतं. संध्याकाळी ऑफिसमधून परतताना किंवा कामाच्या मधल्या ब्रेकमध्येही लोक चहा-बिस्किटच घेतात. पण हा कॉम्बो जितका आवडता, तितकाच शरीरासाठी हानीकारकही ठरू शकतो, असं तज्ज्ञ सांगतात.
सर्वात पहिला धोका
बिस्किटातील मैदा आणि जास्त प्रमाणातील साखर. बहुतांश बिस्किटे रिफाइंड फ्लोअरपासून बनवली जातात. मैदा पचायला खूप वेळ लागतो आणि पोटात गॅस, ऍसिडिटी निर्माण करतो. यावर गरम चहा प्यायचा झाला, तर पोटावरचा ताण आणखी वाढतो. चहातील टॅनिन्स हे पोटात अन्न पचवणाऱ्या एन्झाइम्सच्या क्रियेवर परिणाम करतात. त्यामुळे पचन मंदावते आणि अन्न नीट शोषलं जात नाही.
दुसरा मोठा मुद्दा म्हणजे इन्सुलिन स्पाइक. चहातील साखर आणि बिस्किटातील साखर एकत्र शरीरात गेल्यावर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. यामुळे काही वेळातच पुन्हा भूक लागते आणि माणूस जास्त खाण्याकडे वळतो. वजन वाढण्यामागे हे कॉम्बिनेशन मोठ्या प्रमाणात जबाबदार ठरू शकतं.
अनेक बिस्किटांमध्ये ट्रान्स फॅट्स, प्रिझर्वेटिव्हज आणि कृत्रिम फ्लेवर्स असतात. हे फॅट्स हृदयासाठी घातक असतात आणि शरीरात खराब कोलेस्टेरॉल वाढवतात. रोजच्या रोज याच सवयीमध्ये राहिल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
चहातील टॅनिन्समुळे शरीरात लोहतत्व, झिंक, कॅल्शियम यांसारख्या मिनरल्सचे शोषण कमी होतं. त्यामुळे कॅल्शियमची कमतरता, हाडे कमकुवत होणे, थकवा, केसगळती अशा तक्रारी निर्माण होऊ शकतात.
ही सवय सोडायची असेल, तर चहासोबत बिस्किटाऐवजी मखाणा, मूठभर ड्रायफ्रूट्स, भाजलेले चणे, घरचे खारवलेले पोहे किंवा फळं हे उत्तम पर्याय ठरू शकतात. चहा प्यायचाच असेल, तर साखर कमी करा किंवा गूळ वापरा. दूधाऐवजी ग्रीन टी किंवा लेमन टीही चांगला पर्याय ठरू शकतो.
शेवटी एकच चहा आणि बिस्किट हे कॉम्बिनेशन चवीला आवडतं, पण शरीरासाठी नाही. त्यामुळे आजपासूनच ही सवय कमी करण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. शरीर निरोगी राहणार, पचन सुधारेल आणि वजनही नियंत्रणात राहील.