

आजकाल हातात घातलेल्या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट ट्रॅकिंग फीचर असणं खूप सामान्य झालं आहे. आता तर स्मार्ट रिंग्स आणि इअरबड्समध्येही हे फीचर येतंय. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे लहानसं डिव्हाइस तुमच्या हृदयाचे ठोके कसे मोजतं? चला, जाणून घेऊया यामागचं विज्ञान.
स्मार्टवॉचच्या मागील बाजूला तुम्ही पाहिलं असेल की सतत हिरव्या रंगाची लाईट फ्लॅश होत असते. ही लाईट आणि त्यासोबत लावलेला ऑप्टिकल सेन्सर हाच हार्ट रेट मोजण्याचं काम करतो.
कलर व्हीलवर लाल आणि हिरवा हे रंग एकमेकांचे अपॉझिट असतात. रक्त हिरव्या रंगाची लाईट पटकन शोषून घेतं. जेवढं रक्त वाहतंय, तेवढी जास्त लाईट शोषली जाते आणि उरलेली लाईट परत परावर्तित होते. ऑप्टिकल सेन्सर त्या परावर्तित लाईटचा अभ्यास करून प्रत्येक ठोक्याचं मापन करतो.
या तंत्रज्ञानाला फोटोप्लेथिस्मोग्राफी (Photoplethysmography – PPG) म्हणतात.
हृदय धडधडल्यावर रक्ताची मात्रा थोडी वाढते आणि शिरे-नसा फुगतात.
यावेळी त्या जास्त हिरवी लाईट शोषतात.
हृदय रिलॅक्स झाल्यावर रक्ताची मात्रा कमी होते आणि लाईटचं शोषणही कमी होतं.
ह्याच पॅटर्नवरून सॉफ्टवेअर तुमच्या पल्स रेटचा अंदाज घेतं आणि स्मार्टवॉचवर हार्ट रेट दाखवतं.
नवीन तंत्रज्ञानामुळे आता स्मार्टवॉच पल्स रेटमध्ये होणारे अनियमित बदल ओळखून काही संभाव्य आजारांचा इशारा देखील देऊ शकतं. मात्र, त्याची अचूकता अजून १००% परिपूर्ण नाही, त्यामुळे नियमित हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे.