

मुलांचे संगोपन करणे हे काही सोपे काम नाही. अनेक पालक मुलांसाठी विविध पद्धती आणि नियम वापरतात. पालक म्हणून मुलांच्या जीवनात आपले खूप महत्त्वाचे स्थान असते. मुलांसाठी त्यांचे पालकच पहिले शिक्षक आणि सुरक्षित ठिकाण असतात. परंतु, अनेकदा पालक जेव्हा मुलांबद्दल जास्त काळजी घेतात, जास्त निर्बंध घालतात किंवा अतिसंरक्षक बनतात, तेव्हा ही गोष्ट मुलांसाठी त्रासदायक ठरू शकते.
पालकांना वाटते की ते आपल्या मुलांना शिस्त लावत आहेत, पण त्यांची ही कठोर पेरेंटिंग कधी 'टॉक्सिसिटी' मध्ये बदलते, हे त्यांना कळत नाही. तुमच्यातही 'या' सवयी आहेत का? असाल, तर तुम्ही नकळतपणे तुमच्या मुलांसाठी 'टॉक्सिक पालक' बनत आहात हे ओळखण्यासाठी खालील 5 सवयी तपासा.
अनेक पालक आपल्या मुलांकडून काहीतरी जास्तच अपेक्षा ठेवतात आणि त्यांना वाटते की मुलांनी कोणताही प्रश्न न विचारता त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करावे.
यामुळे मुलांना त्यांच्या मनातले प्रश्न विचारण्याची इच्छा आणि उत्सुकता दडपून टाकावी लागते.
अशा घरांमध्ये चर्चा करण्याची संधी मुलांना मिळत नाही. अनेक प्रकरणांत मुले पालकांना घाबरून बोलणेच बंद करतात.
प्रत्येक पालकाला आपल्या मुलांनी प्रगती केलेली पाहायला आवडते. पण जेव्हा पालक मुलांसाठी यशाचा एक अटळ स्तर सेट करतात, जो त्यांना कोणत्याही परिस्थितीत पार करावा लागतो, तेव्हा परिस्थिती बिघडते.
अशा अपेक्षेमुळे मुलांवर प्रचंड दबाव येतो.
मुले सतत अस्वस्थता आणि भीती घेऊन जगू लागतात. अशा प्रकारची पेरेंटिंग लवकरच टॉक्सिसिटीमध्ये रूपांतरित होते.
कठोर पालक अनेकदा मुलांवर अनेक निर्बंध घालतात, जसे की 'तू इथे जाऊ नकोस', 'तिथे फिरू नकोस'. यामुळे मुलांचे काहीही वैयक्तिक राहत नाही.
मुलांच्या करियरपासून ते लाईफ पार्टनर निवडण्यापर्यंत सर्व काही पालकच ठरवतात.
ही परिस्थिती अत्यंत टॉक्सिक असते. अशा वातावरणामुळे मुल स्वतंत्र बनत नाही आणि संपूर्ण आयुष्य घाबरून घालवते.
काही कठोर पालक आपल्या मुलांना त्यांचे दुःख, वेदना, उदासी आणि कमकुवत भावना दाबून ठेवण्यास भाग पाडतात, जेणेकरून कोणी त्यांचा गैरफायदा घेऊ नये.
मुलांना 'मुले रडत नाहीत' किंवा 'तुझ्या भावना लपवून ठेव' असे सांगणे पूर्णपणे चुकीचे आहे आणि हे टॉक्सिसिटीचे मोठे लक्षण आहे.
मुलांना मोकळेपणाने भावना व्यक्त करण्याची संधी न मिळाल्यास त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
अनेक घरांमध्ये पालक मुलांना फक्त शिस्त पाळल्यावरच प्रेम करतात.
अशा घरांमध्ये मुलांची प्रशंसा किंवा शाबासकी नगण्य असते. मुलांना असे वाटू लागते की, चांगले गुण मिळवले किंवा मेडल-ट्रॉफी जिंकल्या तरच प्रेम मिळते.
प्रेम मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, हा विचार मुलांच्या मनात घर करतो. अशा प्रकारची पेरेंटिंग पालक आणि मुलांच्या नात्यासाठी अत्यंत धोकादायक ठरते आणि त्यांच्यातील संबंध खराब करते.
या 5 सवयी तुमच्यात आढळल्यास, वेळीच सावध व्हा आणि तुमच्या पेरेंटिंगच्या पद्धतीत सकारात्मक बदल घडवा.