

नाशिक : महाप्रसादाचे आयोजन करताना गणेश मंडळांना अन्नपरवाना घेणे बंधनकारक असणार आहे. याबाबतचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले असून, गणेशोत्सव काळात भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाचा डोळा असणार आहे. या काळात मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या महाप्रसादासह आस्थापनांकडून विक्री केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची तपासणी तसेच नमुने घेण्याची विशेष मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ निदर्शनास आल्यास, संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नुसार कडक कारवाई केली जाणार असल्याचे अन्नप्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भाविक तसेच ग्राहकांना सुरक्षित, निर्भेळ व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या हेतूने प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहेे. गणेशोत्सव काळात गणेश मंडळे तसेच विक्रेत्यांना स्पष्ट सूचना देताना किमान ऑनलाइन पद्धतीने अन्नपरवाने घेणे, नोंदणी अर्ज करूनच महाप्रसादाचे वाटप करणे बंधनकारक केले आहे. तसेच मंडळांनी महाप्रसाद स्वच्छ व आरोग्यदायी जागेतच तयार करावा, कच्चे अन्नपदार्थांचे खरेदी बिले जतन करून ठेवावीत, भाविकांना ताज्या अन्नपदार्थांचेच वाटप करावे, महाप्रसादात विषबाधा होईल असे दूध व दुग्धजन्य पदार्थ टाळावेत, महाप्रसादात पिण्याच्या पाण्याचाच वापर करावा, या पाण्याची योग्य ठिकाणी साठवणूक करावी आदी सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत. गणेश मंडळांकडून या सूचनांचे पालन न केल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अन्नप्रशासनाचे सहआयुक्त उ. सि. लोहकरे यांनी दिला आहे.
- विक्रेत्यांनी ट्रेवर दर्शनी भागात मिठाई वापरण्यायोग्यचा कालावधी नमूद करावा.
- विक्रेत्यांनी दुध, खवा, खाद्यतेल, वनस्पती आदी कच्चे पदार्थ परवानाधारक, व्यावसायिकांकडूनच खरेदी करावेत, त्याबाबतचे बिल जतन करावे.
- विक्रेत्यांनी कामगारांची त्वचा व संसर्गजन्य आजाराबाबतची वैद्यकीय तपासणी करावी.
- फूड ग्रेड खाद्य रंगाचाच शंभर पीपीएमच्या मर्यादेत वापर करावा.
- दुग्धजन्य पदार्थांच्या मिठाईचे सेवन त्वरित करण्याबाबत ग्राहकांना सूचित करावे.
- अन्नपदार्थ जाळीदार झाकणाने झाकून ठेवावे.
- अन्नपदार्थ तयार करताना खाद्यतेल दोन ते तीन वेळाच तळण्यासाठी वापरावे.