Ganeshotsav 2024 | बाप्पाच्या आगमनासाठी नाशिककर सज्ज, सर्वत्र चैतन्यमयी वातावरण

सायंकाळपर्यंत प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त
Ganeshotsav nashik
मानाचा भद्रकालीचा राजा (छाया -हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : - ६४ कलांचा अधिपती असलेल्या लाडक्या गणरायाचे आज (दि. ७) मंंगलवाद्यांच्या गजरात थाटात आगमन होणार आहे. बाप्पाला घरी आणण्यासाठी बालगोपाळ, ज्येष्ठांसह महिलावर्गही आतुरला आहे. गणेशाला बुद्धी, ज्ञान आणि सुखसमृद्धीची देवता मानली जाते. बाप्पाच्या आगमनाने वातावरणात सर्वत्र आनंद, उत्साह निर्माण झाल्याची अनुभूती मिळत आहे. यंदा ११ दिवस चालणार्‍या या उत्सवात कुटुंबांसह सार्वजनिक मंडळेही सज्ज झाली आहेत.

बाप्पाच्या स्वागतासाठी घराघरात विद्युत रोषणाई, आर्टिफिशियल फुलांच्या माळा, आकर्षक मखराने सजावट करण्यात आली आहे. ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत गणरायाला घरी आणण्यासाठी पारंपरिक पोशाख घालून यजमान मंडळी तयार आहेत. सार्वजनिक गणेशमंडळांची सजावटही पूर्ण झाली असून, मिरवणुकीद्वारे आज बाप्पा चौकाचौकांत विराजमान होणार आहे. सजावटीचे साहित्य खरेदीसाठी रविवार कारंजा, शालिमार, सराफ बाजार, मालेगाव स्टँड, डोंगरे वसतिगृह मैदान, दहीपूल, भद्रकाली परिसरात बाजारात भाविकांची झुंंबड उडाल्याने सर्वत्र चैतन्यमयी वातावरण तयार झाले आहे.

सजवटीचा भार घरातील पुरुष मंडळींनी, तर नैवेद्याची जबाबदारी गृहिणींनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. लाडक्या गणरायाला मोदकांचा प्रसाद, उकडीचे मोदक, विविध प्रकारचे लाडू, २१ प्रकारच्या भाज्या, बदामाचा, रवा-केळीचा शिरा, पुरणपोळी, पंचखाद्य, खिरापत, खीर, पेढे, ओल्या नारळाच्या करंज्या, साखरभात या पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू आहे.

पूजेसाठी आवश्यक सामग्री

श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करताना पूजा साहित्यात विड्याची पाने, सुपार्‍या, नारळ, आंब्याचे डहाळे, चौरंग व पाट, ताम्हण, तांब्याची पळी, जानवे, जोड, घंटी, समई, नैवेद्याचा गूळ व खोबर्‍याची वाटी, पाच फळे, हळदी-कुंकू, गुलाल आदी साहित्याचा समावेश असतो.

मंडळांची लगबग

शहरातील मोठ्या गणेशमंडळांची आरास पूर्ण होत आली असून उद्यापर्यंत गणेश देखावे गणेशभक्तांसाठी खुले होतील. भद्रकालीचा राजा, नाशिकचा राजा, दंडे हनुमान मित्रमंडळ, इंदिरानगर युवक मित्रमंडळ, स्वा. वि. सावरकर मित्रमंडळ, बी. डी. भालेकर मैदानावरील गणेशमंडळांकडून युद्धपातळीवर आरास पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू आहे.

आज गणेश चतुर्थी. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत श्रीगणेशाच्या स्थापनेचा मुहूर्त आहे. साधारणत: दुपारी १.३० पर्यंत घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त असून, सार्वजनिक मंडळे सूर्यास्तापर्यंत स्थापना करू शकतील. यादिवशी चंद्रदर्शन निषिद्ध आहे.

- डॉ. नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news