अजित पवार यांचे केंद्रीय रेल्‍वेमंत्र्यांना पत्र; गणेशोत्‍सवात चाकरमान्यांसाठी अतिरिक्‍त गाड्या सोडण्याची मागणी

अजित पवार
अजित पवार
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनीटात फुल्ल होत आहे. रेल्वे अधिकारी आणि तिकिटांच्या दलालांच्यातल्या अभद्र युतीमुळेच हे होत असावे. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात. त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करुन चढ्या दराने त्याची विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. यामध्ये कोणा-कोणाचे हितसंबध गुंतले आहेत, या गैर प्रकारात कोण-कोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. या तिकीटाच्या आरक्षणांची मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वने चौकशी करावी. अशा रेल्वे दलालांवर नियंत्रण ठेवावे. तसेच कोकणच्या चाकरमान्यांच्या सोईसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राव्दारे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना केली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आणि विशेषत: कोकणवासीयांच्या अस्मितेचा, श्रध्देचा, जिव्हाळ्याचा आणि संस्कृतीचा विषय आहे. गणेशोत्सवाची वाट प्रत्येक मराठी माणूस आणि विशेषत: कोकणवासीय वर्षभर बघत असतो. कामानिमित्त जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असला, कितीही अडचणी असल्या तरी कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जातोच. त्याची तयारी व नियोजन प्रत्येक कोकणवासीय चाकरमानी अगदी वर्षभरापासून करत असतो. गणेशोत्सव हा कोकणाचा मोलाचा ठेवा व सांस्कृतिक संचित आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. तसेच या महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे. या महामार्गावरुन प्रवास करणे अत्यंत त्रासदायक आहे. त्यामुळे रस्त्याने प्रवास करणे हा पर्याय सुध्दा व्यवहार्य ठरत नाही. कोकणाला जोडण्यासाठी तसेच कोकणवासीय चाकरमान्यांच्या सोईसाठी महत्वकांक्षी कोकण रेल्वेची निर्मिती करण्यात आली आहे. कोकण रेल्वे ही कोकणवासीयांची जीवनवाहिनी आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना आतापासूनच प्रतिक्षा यादींचे फलक लागले आहेत. मुंबईच्या छत्रपती टर्मिनसवरुन दि. 15 सप्टेंबरला सुटणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसची प्रतिक्षायादी अवघ्या दीड मिनीटातच हजारापार गेल्याची बाब समोर आली आहे. तर दि. 16 सप्टेंबरचे आरक्षण करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना सर्वच गाड्यांसमोर 'रिग्रेट' हा मेसेज येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षणात गैरप्रकार होत असावेत, अशी शंका घेण्यास वाव आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.

गणेशोत्सवासाठी गावी जाण्याचा निर्धार केलेले हजारो चाकरमानी तीन महिने अधिपासूनच गावी जाण्या-येण्याचे नियोजन करत असतात. त्यासाठी रात्रभर जागून कोकण रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळविण्याचा प्रयत्न करत असतात. यंदा गणेशोत्सव दि. 19 सप्टेंबर रोजी सुरु होत आहे. त्यामुळे त्या आधीच्या किमान दोन दिवसांचे म्हणजे दि. 17 सप्टेंबरचे या प्रवसाच्या तारखेचे 120 दिवस आधीचे आरक्षण शुक्रवारी खुले झाले. मात्र पहिल्याच दिवशी अवघ्या एक ते दोन मिनिटात आरक्षण पूर्ण झाले, तर प्रतिक्षायादीचे लांबच्या लांब फलक लागले आहेत. हा प्रकार म्हणजे रेल्वेच्या आरक्षणात गैरप्रकार होत असण्याची शक्यता अधिक आहे.

रेल्वे तिकीटाची अवैध प्रकारे विक्री करणारे दलाल मोठ्या संख्येने तिकीटांचे आरक्षण करुन ते चढ्या दराने विक्री करत असल्याचा आजपर्यंतचा अनेकांचा अनुभव आहे. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने आरक्षण करुन चढ्या दराने विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. यामध्ये कोणा-कोणाचे हितसंबध गुंतले आहेत, या गैर प्रकारात कोण-कोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे या तिकीटाच्या आरक्षणांची मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वने चौकशी करावी. अशा रेल्वे दलालांवर नियंत्रण ठेवावे. तसेच कोकणच्या चाकरमान्यांच्या सोईसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्यात याव्यात, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news