

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर कारखाना स्थळावर बिबट्याचा वावर आढळून आल्याने स्थानिक नागरिक , कारखाना कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. भीमाशंकर साखर कारखाना पेट्रोल पंपावर बुधवारी (दि. १४ ) रात्री एक वाजण्याच्या सुमारास वॉचमन अविनाश धायबर यांना बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला. त्यांनी कारखाना परिसरात गस्त घालणारे सुरक्षारक्षक सागर हिंगे यांना फोनवरून ही माहिती दिली. सुरक्षारक्षक सागर हिंगे ताबडतोब कारखान्याच्या बोलेरो या वाहनाने तेथे आले. त्यावेळी वाहनचालक अविनाश गावडे व सागर हिंगे यांनी शेजारील घाटाच्या दिशेने बोलेरो गाडी फिरवली.
त्यावेळेस त्यांना बिबट्या गवतातून जाताना दिसला. त्यांनी बिबट्याच्या पाठीमागे गाडी हळूहळू चालवत नेली. कारखाना कर्मचाऱ्यांच्या वसाहतीपर्यंत बिबट्या गेला. तेथील सुरक्षारक्षक विलास बढे यांनी बिबट्याला पाहिले. विलास बढे हे गाडीत बसले, त्यावेळी बिबट्या शेजारील चिकूच्या बागेत शिरून कुत्र्याला ठार मारून खात असल्याचे दिसत होते. सागर हिंगे यांनी मोबाईलमध्ये हे दृश्य कैद केले. हिंगे यांनी कारखाना प्रशासनाला ही माहिती दिली. प्रशासनाने वनविभागाला घटनेची खबर दिली. वनरक्षक साईमाला गित्ते यांनी गुरुवारी (दि. १५) सकाळी भीमाशंकर कारखाना स्थळावर येऊन पाहणी केली. दरम्यान मागील आठवड्यात देखील सागर हिंगे हे रात्रीच्या वेळी ड्युटीवर असताना त्यांना बिबट्या दृष्टीस पडला होता. या घटनेमुळे कारखाना परिसरातील स्थानिक नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.