

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक लावण्यांचा ठसकेबाज आवाज असलेल्या सुलोचना चव्हाण यांचं आज निधन झालं. त्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. सहा दशकांहून अधिक काळ लावणीचा आवाज म्हणून सुलोचना यांची ओळख बनली होती.
लावणीचा ठसका म्हणलं की आजही डोळ्यासमोर येतो ते सुलोचना चव्हाण यांचा खणखणीत आवाज. फडापर्यंतच सीमित असलेली लावणी हा महाराष्ट्राचा लोकप्रिय नृत्यप्रकार सुलोचना यांच्या आवाजाने सर्वश्रुत केला. अनेक लावण्या त्यांच्या आवाजाने सजल्या आहेत.
अगदी परकरी वयांपासून सुलोचना यांनी गाण्यास सुरुवात केली. उर्दू, गुजराती या नाटकांमधून त्यांनी अभिनय आणि गाण्याची सुरुवात केली. शामसुंदर या दिग्दर्शकांनी त्यांना सिनेमात गाण्याची संधी दिली. हिंदी सिनेमातील गाणी, गझल्स असे अनेक प्रकार त्यांनी गायले. पण तोपर्यन्त त्यांनी लावणी गायली नव्हती. ती संधी त्यांना मिळाली 'ती रंगल्या रात्री अशा' या सिनेमात. त्यानंतर सुलोचना यांचं नाव लावणीशी जोडलं जाऊ लागलं. याच लावणीने त्यांची त्यांच्या जीवनसाथीसोबत भेटही झाली. दिग्दर्शक असलेल्या पतीच्या 'कलगीतुरा' या सिनेमात त्यांनी पुन्हा लावणी गायली. यानंतर मात्र गायलेल्या लावणीने त्यांचं नाव सर्वदूर पोहोचवलं. जगदीश खेबूडकरांनी शब्द साज चढवलेली ती लावणी होती, 'मला म्हणतात लवंगी मिरची…' या लावणीने त्यांना पुरस्कारही मिळवून दिला. पण तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक लावणीगणिक त्यांनी सादर करण्याच्या पद्धतीत सुधारणा केली. पण आपल्या या यशाचं श्रेय सुलोचनाबाई आपल्या यजमानांना देतात.
"लावणीसम्राज्ञी' हा किताब मला चव्हाणांमुळे मिळाल्याचं' त्यांनी अनेकदा नमूद केलं होतं. अनेकदा रेकॉर्डिंगवेळी चव्हाण त्यांना विशिष्ट शब्दांची फेक कशी करावी, त्याच लहेजा कसा असावा याच्या सूचना करायचे. त्यामुळेच त्यांची लावणी अधिक बहरत गेल्याचं त्या सांगतात.