‘हॉबिट’आजही आहेत?

‘हॉबिट’आजही आहेत?
Published on
Updated on

मनुष्य प्राण्याचा समावेश 'ग्रेट एप्स'मध्ये केला जातो. हे 'एप' वर्गातील प्राणी म्हणजे बिनशेपटीचे वानर! त्यापैकी 'ग्रेट एप' म्हणजे गोरीला, बोनोबो, चिम्पांझी आणि ओरांगऊटान. 'लेसर एप'मध्ये गिबन आणि सियामंगचा समावेश होतो. हे 'ग्रेट एप्स' ज्या 'होमिनीड' कुळातील असतात त्यामधूनच पुढे आधुनिक मानवाचे पूर्वज असलेले 'होमो सेपियन्स' विकसित झाले. त्यांच्या आधी 'होमो हॅबिलिस' म्हणजेच हाताचा कौशल्याने वापर करून दैनंदिन गरजांसाठी साधने (टूल्स) बनवणारा माणूस विकसित झाला.  त्यानंतर 'होमो इरेक्टस' म्हणजेच पाठीचा कणा ताठ ठेवून दोन पायांवर चालणारा माणूस विकसित झाला.

या टप्प्यात बुद्धीचा आणखी विकास झाला होता. त्याच्या पुढच्या पायरीत 'होमो सेपियन्स' मानव विकसित झाले, ज्यांची बुद्धी अतिशय विकसित झाली होती. हेच आधुनिक मानवाचे पूर्वज. मात्र, हीच एकमेव मनुष्य प्रजाती होती असे नव्हे. निएंडरथल आणि डेनिसोव्हन नावाच्या अन्यही काही मानव प्रजाती कालौघात विकसित झाल्या होत्या. त्या कालांतराने लुप्त झाल्या किंवा 'होमो सेपियन्स'मध्ये मिसळून गेल्या. अशाच लुप्त झालेल्या मानव प्रजातींमध्ये 'होमो फ्लोरेसिएन्सिस' किंवा 'हॉबिट' ही प्रजाती होती. 7 लाख ते 60 हजार वर्षांपूर्वीच्या काळात सध्याच्या इंडोनेशियाच्या फ्लोरेस बेटावर ही प्रजाती अस्तित्वात होती. त्यांना 'हॉबिट' हे नाव त्यांच्या बुटकेपणामुळे देण्यात आलेले आहे. हे मानव अवघे तीन फूट सहा इंच उंचीचे होते. त्यांचा मेंदू लहान आकाराचा होता. पावले मोठी होती आणि ते विविध साधने बनवू शकत होते. त्यांचा उदय कसा व कुठे झाला, हे अजूनही एक गूढच आहे. मात्र, आता त्यांचा अस्तही झालेला नाही, असा दावा करून एका संशोधकाने खळबळ माजवलेली आहे.

सध्याच्या काळातही मानवाची ही प्रागैतिहासिक काळापासूनची अन्य प्रजाती अस्तित्वात असल्याचा हा दावा आहे. ग्रेगरी फोर्थ नावाच्या अँथ्रोपोलॉजिस्टने हा दावा केलेला आहे. अल्बर्टा युनिव्हर्सिटीतून निवृत्त झालेल्या या संशोधकाने आपल्या 'बिटविन एप अँड ह्युमन ः अ‍ॅन अँथ्रोपोलॉजिस्ट ऑन द ट्रेल ऑफ अ हिडन होमिनॉईड' या पुस्तकात हा दावा केला आहे. इंडोनेशियाच्या फ्लोरेस बेटावर ते 1984 पासून अँथ्रोपोलॉजिकल कार्य करीत होते. त्यावेळेपासूनच त्यांनी स्थानिक लोकांकडून विचित्र मानवसद़ृश प्राण्यांच्या अनेक कथा ऐकल्या होत्या. जंगलात माणसासारखे बुटके व केसाळ प्राणी राहतात, असे अनेकांनी त्यांना सांगितले होते. त्यांनी 2003 पर्यंत आपल्या अनेक शोधनिबंधांमध्ये या गोष्टींचा उल्लेख केला होता.

2003 मध्ये 'एच फ्लोरेसिएन्सिस' या वेगळ्या मनुष्य प्रजातीबाबत संशोधन झाले, त्यावेळी त्यांनी या कथांचा संबंध 'एच फ्लोरेसिएन्सिस'शी जोडण्यास सुरुवात केली. त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, फ्लोरेस बेटाच्या 'लिओ' नावाच्या ठिकाणी असलेल्या जंगलात असे बुटके व केसाळ माणसे राहतात, असे त्यांनी ऐकले होते. 'एच फ्लोरेसिएन्सिस'च्या वर्णनाशी मिळतेजुळते असेच हे लोक होते. ते अद्यापही अस्तित्वात असल्याचे स्थानिक लोकांच्या बोलण्यातून समजत होते. त्यांनी एका अशा माणसाचीही मुलाखत घेतली होती, ज्याने त्या विचित्र प्राण्याचा मृतदेहही पाहिला होता. हा मृतदेह माणसाचाही नव्हता आणि माकडाचाही नव्हता. हा बुटका जीव शरीरावर हलक्या रंगाचे सरळ केस असलेला व नीटनेटक्या नाकाचा होता. अशा माणसांना प्रत्यक्ष पाहिलेल्या तीस लोकांच्या भेटीही फोर्थ यांनी घेतल्या. त्यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की, ही प्राचीन काळातील मानव प्रजाती फ्लोरेस बेटावर अजूनही जिवंत आहे.

अर्थातच, त्यांच्या या दाव्याला अनेक संशोधकांनी विरोध केलेला आहे. विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटीतील पॅलिओ अँथ्रोपोलॉजिस्ट जॉन हॉक्स यांनी म्हटले आहे की, 'सध्या फ्लोरेस हे कनेक्टिकटइतक्या आकाराचे मोठे ठिकाण असून तिथे वीस लाख लोक राहतात. संपूर्ण बेटावर सध्या मनुष्यवस्ती आहे. अशा स्थितीत ही 'हॉबिट' माणसे इतकी वर्षे आधुनिक माणसाच्या नजरेपासून दूर राहणे शक्य नाही.' हॉक्स यांचे हे म्हणणेही सध्याच्या उपग्रहांच्या आणि आधुनिक साधनांनी संपन्न दुनियेचा विचार करता संयुक्तिक वाटते. 'बिगफूट' किंवा 'यती'सारख्या या दंतकथाच आहेत का, हे काळाच्या ओघात स्पष्ट होईल.

या पृथ्वीतलावर माणसाची एक वेगळी व प्राचीन प्रजाती आजही अस्तित्वात आहे, असे म्हटले, तर आपल्या भुवया निश्चितच उंचावू शकतात. इंडोनेशियाच्या फ्लोरेस बेटावर बुटक्या 'हॉबिट' मानवांची प्राचीन प्रजाती आजही अस्तित्वात असल्याचा दावा करून एका संशोधकाने खळबळ माजवली आहे.

– सचिन बनछोडे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news