डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : मागील तीन दिवसांपासून शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे समर्थक आमदारांविषयी व्यक्तिगत, स्तर सोडून विधाने करत सुटले असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी डोंबिवली परिसरातील शिंदे समर्थकांनी घरडा सर्कल येथे संजय राऊत यांचा पुतळा जाळला. हिम्मत असेल तर राऊत समर्थकांनी रस्त्यावर उतरून आमच्याशी लढत द्यावी, असे आव्हान शिंदे समर्थकांनी राऊत समर्थकांना दिले.
घरडा सर्कल येथे सोमवारी दुपारी अचानक हा प्रकार घडल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. संतप्त शिवसैनिक मानपाडा रोडला असलेल्या शिवसेना मध्यवर्ती शाखेकडे जमावाने येत असल्याची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी तातडीने मध्यवर्ती शाखेभोवती अडथळे उभे केले. 100 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त अल्पवेळात शाखेसमोर लावण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर घटनास्थळी उपस्थित होते.
खा. राऊत यांच्या विधानांमुळे आम्ही व्यथित झालो आहोत. राऊत आणि त्यांच्या समर्थकांनी हिम्मत असेल तर रस्त्यावर उतरून आमच्याशी लढावे आम्ही त्याला तोंड देण्यास समर्थ आहोत, असे आव्हान शिंदे समर्थकांनी दिले. तसेच यावेळी शिंदे समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर घोषणा दिल्या.