हसन मुश्रीफ यांचा चेहरा गोजिरवाणा : नाना पाटेकर

हसन मुश्रीफ यांचा चेहरा गोजिरवाणा : नाना पाटेकर
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राजकारणात या म्हणून गूळ-खोबरे घेऊन तुमच्या दारात कोणी बोलवायला आले नव्हते. सेवा करायची नसेल तर घरात बसा; पण लोकांनी निवडून दिल्यानंतर त्यांच्यासाठी जीवन समपिर्र्त करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे, असे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी शनिवारी कागल येथे बोलताना सांगितले.

कागल येथील गैबी चौकात उभारण्यात आलेल्या महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे व श्री शाहू उद्यानात उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे अनावरण शनिवारी पाटेकर यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. त्यानिमित्त राष्ट्रीय महार्गावरील नवीन आरटीओ चेक पोस्ट नाक्याजवळ आयोजित केलेल्या 'जागर समतेचा' कार्यक्रमात ते बोलत होते.

आज पुतळ्यांचे नव्हे, तर विचारांचे अनावरण झाले आहे. थोर व्यक्तींचे पुतळे उभारताना त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करा. डॉ. आंबेडकर यांनी सर्वांसाठी काम केले. बाराव्या शतकात बसवेश्वर यांनी केलेले आंतरजातीय विवाहाचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. कागलमध्ये जाती-धर्माचा विचार केला जात नाही. तसे झाले असते तर मुश्रीफ सलग पाचवेळा निवडून आले नसते. पंचवीस वर्षे निवडून येणे सोपे नाही. याठिकाणी उपस्थित जनसुमदाय पाहिल्यानंतर मुश्रीफ यांच्यावरील प्रेम नव्हे तर त्यांनी केलेल्या विकासकामांवरील प्रेम दिसून येते, असेही पाटेकर म्हणाले.

राजकारण आणि कलाक्षेत्रात जातपात नव्हे तर हुनर पाहिली जाते आणि राजकारणात हुनर लागते. सामान्य माणसांना अन्न, वस्त्रांची वानवा आहे. ते सर्वजण तुमच्या मागे आहेत म्हणून त्यांना दाबू नका. व्यासपीठावर असणार्‍या काही कार्यकर्त्यांची आता सुरुवात आहे. त्यांनी काम करत राहावे. लोकांचे प्रश्न सोडविणे तुमची जबाबदारी आहे. खा. संजय मंडलिक यांनी महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली होती. त्याचा धागा पकडत पाटेकर यांनी, नुसते पुतळे उभा करून चालणार नाहीत, गांधी मनात असावे लागतात. त्यांचे विचार आचरणात आणावे लागतात, असे सांगितले.

मुश्रीफ यांनी केलेल्या मागण्या उपमुख्यमत्री अजित पवार नक्कीच मान्य करतील. कारण, ते सर्वांसाठी काम करतात, असेही पाटेकर म्हणाले.

कागल व गडहिंग्लज औद्योगिक वसाहतींमध्ये नवीन मोठे प्रकल्प तसेच कागल येथे आय.टी. पार्क सुरू करण्याबाबत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करणार होतो; परंतु ते उपस्थित राहू शकले नाहीत. याबाबत त्यांना आपण सांगू. थोर पुरुषांचा आदर तरुणांसमोर राहावा म्हणून पुतळे उभारण्यात आले आहेत. देशभक्ती व राष्ट्रप्रेम जागविण्याचे काम पाटेकर यांनी अभिनयातून करण्याचा प्रयत्न केला. तर नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सामान्यांसाठी ते काम करत आहेत, असे सांगत ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी अध्यक्षीय भाषणात नाना पाटेकर यांचे सिनेमातील काही डायलॉग म्हणून दाखविले. त्याचा पाटेकर यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.

महागाईचा आक्रोश बाजूला ठेवून काहीजण समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. बारामतीनंतर विकासाच्या बाबतीत कागल पुढे असून, इतरांनी आदर्श घ्यावा, असे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

कागल नगरपालिकेने राजर्षी शाहूंच्या भूमीतून समतेचा संदेश दिला आहे. यानिमित्ताने महापुरुषांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीसमोर जाईल. समतेचा कागलमधील जागर देशभर जावा, त्याचे जतन व्हावे, असे खा. संजय मंडलिक म्हणाले.

देशात सुरू असलेल्या जाती-पातीच्या राजकारणाला बांध घालण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची गरज असल्याचे खा. धैर्यशील माने यांनी सांगितले. माजी आ. मालोजीराजे यांनी प्रतिकूल परिस्थितीत माणूस म्हणून जगण्याचे बळ राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराने दिल्याचे सांगितले.

कागलचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी स्वागत केले. प्रताप माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजूबाबा आवळे, माजी आ. संजय घाटगे, माजी आ. संध्यादेवी कुपेकर, डॉ. सुजित मिणचेकर, राजीव आवळे, नवीद मुश्रीफ, प्रवीणसिंह पाटील, आण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, उद्योगपती व्ही. बी. पाटील, युवराज पाटील, गणपतराव फराकटे, अंबरिष घाटगे, सतीश पाटील-गिजवणेकर, चंद्रकांत गवळी, उत्तम कांबळे, दगडू भास्कर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

…तर मुश्रीफ यांना सर्वाधिक टॅक्स भरावा लागला असता

आपल्याकडे अजून लोक जमविण्यावर टॅक्स बसविण्यात आलेला नाही. नाही तर येथील उपस्थित जनसमुदाय पाहता मुश्रीफ सर्वाधिक टॅक्स भरणारे झाले असते, असे पाटेकर म्हणाले. सलग पाचवेळा निवडून येणार्‍या मुश्रीफांनी आता सिनेमामध्ये काम करावे, त्यांच्या जागेवर मी निवडणूक लढवितो. थोडा वजनदार होतो. त्यांच्या कामावर मी निश्चित विजयी होईन, असे पाटेकर म्हणताच उपस्थितांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

* कामगारमंत्री हसन मुश्रीफ हे नावाप्रमाणेच हसतमुख आहेत. त्यांचा चेहरा गोजिरवाणा आहे. मर्फी रोडिओच्या जाहिरातीमध्ये त्यांनी मॉडेलिंग केले आहे, असे अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटल्यावर सभा मंडपात एकच हशा पिकला.

* ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या 75 व्या वाढदिवसाचा संदर्भ देत नाना पाटेकर यांनी पडत्या काळात अशोक सराफ यांनी आपणास खूप मदत केल्याचे भाषणात सांगितले. त्यांनी नम्रपणे केलेल्या वक्तव्यास उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news