कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : फुकटच्या कमाईला सोकावलेले गुन्हेगार पैशासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे प्रत्यंतर 'हनी ट्रॅप' प्रकरणात येत आहे. सराईत टोळीतील साथीदारांनी पत्नीपाठोपाठ सख्ख्या बहिणीचाही 'हनी ट्रॅप'साठी वापर केला. कोल्हापुरातील बड्या व्यापार्याला अडीच लाखांना लुटले. ही घटना रविवारी उघडकीला आली. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात महिलेसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ऑक्टोबर 2019 ते मे 2021 या काळात बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी संशयितांनी दिली. त्यानंतर चारवेळा व्यापार्याकडून खंडणी वसूल केली आहे. टोळीचा म्होरक्या गुंड सागर माने, विजय कलकुटगी, सिया मोरे, विजय मोरे, फारूख शेख आणि सिया मोरे हिचा भाऊ, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. टोळीतील म्होरक्यासह संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितले.
हनी ट्रॅप प्रकरणी संशयित सागर माने, विजय कलकुटगी, फारूख शेखविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल होत आहेत. तिघेही टोळीतील प्रमुख संशयित आहेत.ऑक्टोबर 2019 ते मे 2021 या काळात संशयित महिलेने तक्रारदार व्यापार्याचा मोबाईल क्रमांक मिळविला. सुरुवातीला व्हॉटस् अॅपद्वारे चॅटिंग करून व्यापार्याला भुरळ घातली. टोळीने महिलेला पुढे करून तिच्यामार्फत व्यापार्याला भेटण्यासाठी बाहेर बोलावले. हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. व्यापार्याशी लाघवी बोलून विश्वास संपादन करण्यात आला.
या घटनेनंतर काही काळाने महिलेने पुन्हा व्यापार्याशी संपर्क साधला. पुन्हा भेटण्यासाठी हॉटेलात बोलावले. यावेळी शारीरिक लगट करण्याचा तिने प्रयत्न केला. त्यानंतर व्यापारी मोपेडवरून घरी परतत असताना टोळीतील साथीदारांनी त्यास रस्त्यात अडविले. व्यापार्याकडील मोपेड जबरदस्तीने काढून घेतली. त्याचे मोटारीतून अपहरण केले. निर्जन ठिकाणी नेऊन मारहाणही केली.
शहरासह जिल्ह्यात 'हनी ट्रॅप'प्रकरणी गुन्हे दाखल होत आहेत. आठवड्यात 'हनी ट्रॅप'च्या गुन्ह्यांची जिल्ह्यातील सहावी घटना असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले. फसगत झालेल्यांनी पोलिस ठाण्यांशी संपर्क साधून तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. तक्रारदारांची नावे गोपनीय ठेवण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.
बहिणीला मोपेडवरून हॉटेलात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप या टोळीने व्यापार्यावर केला. पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही संशयितांनी दिली. या प्रकारामुळे भेदरलेल्या व्यापार्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली. प्रकरण मिटवायचे असल्यास खंडणी द्यावी लागेल, असे सुनावले. दोनवेळा 50 हजार, त्यानंतर 60 हजार व 90 हजार अशी एकूण 2 लाख 50 हजारांची रक्कम उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.