स्व. खशाबा जाधव यांच्या पद्मश्रीचे सरकारला वावडे; कुस्ती शौकिनांमधून संतप्त प्रतिक्रिया

स्व. खशाबा जाधव यांच्या पद्मश्रीचे सरकारला वावडे; कुस्ती शौकिनांमधून संतप्त प्रतिक्रिया

सातारा; विशाल गुजर : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पै. (स्व.) खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये कास्यपदक पटकावले होते. यामुळे सातार्‍याचा नावलौकीक जगभर झाला होता. मात्र, यानंतरही त्यांची दखल भारत सरकारने घेतलेली नाही. त्यामुळे सरकारला स्व. खाशाबा जाधव यांच्या पद्मश्री पुरस्काराचे वावडे असल्याचेच दिसून येत आहे.

अन्य ऑलिपिक प्राप्त पदक विजेत्यांना पुरस्कार देवून गौरवण्यात आले असताना खाशाबा जाधव यांच्यावर मात्र अन्याय झाला असल्याच्या प्रतिक्रीया कुस्ती शौकिनांमध्ये उमटू लागल्या आहेत. 1952 मध्ये झालेल्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये ते सहभागी होते. जाधव यांनी आपल्या पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत मैदान मारताना कांस्यपदक मिळवले. वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. खाशाबा जाधव यांचा जन्म दि. 15 जानेवारी 1926 रोजी कराड तालुक्यातील गोळेश्वर येथे झाला तर 14 ऑगस्ट 1984 मध्ये निधन झाले. निधनानंतर तब्बल 16 वर्षांनी त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार देण्यात आला. यावर वारंवार विविध संघटना, जाधव कुटूंबीय, लोकप्रतिनिधी यांनी त्यांना पद्मविभूषण पुरस्कार द्यावा यासाठी मागणी केली. मात्र, यंदाच्या पद्मविभूषण पुरस्कारात खाशाबा जाधव यांचा समावेश झाला नाही. गेली 13 वर्षे त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळावा यासाठी लढा देणारे त्यांचे चिरंजीव रणजीत यांना आपल्या वडिलांची कामगिरी केंद्र आणि राज्य शासनास दुय्यम का वाटत आहे? असा सवाल उपस्थित करत आहेत.

2010 मध्ये दिल्लीत स्व. खाशाबा जाधव यांच्या नावाने भव्य स्टेडियम उभारले गेले. त्याचवेळीस खाशाबांना पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला पाहिजे असा, निर्धार त्यांच्या मुलाने उदघाटनावेळी केला. अनेक लोकप्रतिनिधी व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या शिफारशी घेवूनही पुरस्कार जाहीर न झाल्याने पदरी निराशाच आली. 41 वर्षांनी हॉकीमध्ये भारताने कांस्यपदक पटकावले. ही बाब देशवासीयांसाठी भूषणावह आहे. त्याहीपेक्षा मेजर ध्यानचंद यांचे खेलरत्नला नाव दिले ही चांगली बाब आहे. मात्र, हे करत हे असताना खाशाबा जाधव यांच्या ऑलिम्पिक पदकाकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रशिक्षण केंद्राचेही काम रखडले….

एकीकडे पद्म पुरस्कारापासून वंचित असतानाच दुसरीकडे ऑलिंपिकवीर स्व. पै. खाशाबा जाधव राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राचे कामही अद्याप रखडले आहे. हे काम रखडल्याने वारंवार आंदोलने करण्यात आली मात्र, यावेळी फक्त संबंधित यंत्रणेकडून फक्त आश्वासने देण्यात आली आहेत. याबाबत अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आली नाही.

खाशाबा जाधव यांच्यानंतर 50 जणांना पुरस्कार

हेलसिंकीच्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावून खाशाबा जाधव यांनी इतिहास रचला होता. या घटनेला आता तब्बल 67 वर्षांचा कालावधी लोटला आहे. तेथूनच देशात खर्‍या अर्थाने कुस्ती क्षेत्राचा नवा अध्याय लिहला गेला. मात्र, ज्यांनी कुस्तीची मुहूर्तमेढ रोवली त्या खाशाबा जाधव यांचा योग्य सन्मान झालेला नाही. मात्र, या कालावधीत केंद्र सरकारने मात्र तब्बल 50 मल्लांचा पद्मविभूषण पुरस्कार देवून सन्मान केला आहे. 1956 ते 1960 या दरम्यान 8, 1961 ते 1970 या कालावधीत 6, 1971 ते 1980 या दहा वर्षात 4, 1981 ते 1990 या दशकात 5, 1991 ते 2000 या वर्षात 15 आणि 2001 ते 2022 या एकविसाव्या शतकात 10 अशा एकूण 50 जणांचा सन्मान करण्यात आला आहे. मात्र, यामध्ये खाशाबा जाधव यांचे कुठेही नाव नाही, ही सातारकरांसाठी खेदाची गोष्ट आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news