स्लिप डिस्कने त्रस्त आहात?, जाणून घ्या निदान आणि उपचार

स्लिप डिस्कने त्रस्त आहात?, जाणून घ्या निदान आणि उपचार
Published on
Updated on

आपल्या पाठीच्या कण्यामुळेच आपल्या शरीराचे संपूर्ण वजन पेलता येते. पाठीचा कणा आपल्या शरीराला गती देतो आणि पाठ, मान, छाती आणि सगळ्या नसांचे संरक्षण करतो.

स्लिप डिस्क म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला संपूर्ण पाठीच्या कण्याची रचना समजून घ्यावी लागेल. पाठीचा कणा हा डोक्याच्या खालच्या भागापासून सुरू होतो आणि टेलबोनपर्यंत जातो. पाठीच्या कण्याचे तीन भाग पडतात.
1) मान किंवा सर्व्हायकल व्हर्टिब्रा
2) छाती (थोरेसिक व्हर्टिब्रा)
3) लोअर बॅक (लंबर व्हर्टिब्रा)

पाठीच्या कण्याच्या हाडांमध्ये एक गादीसारखी मऊ मुलायम पदार्थ असतो, ज्याला डिस्क असे म्हणतात. या डिस्क एकमेकांना जोडलेल्या असतात आणि मणक्यांच्या बरोबर मध्यभागी असतात. या डिस्क पाठीच्या कण्याच्या शॉक अ‍ॅब्सॉर्बर म्हणून काम करतात. पुढे, मागे, डावीकडे, उजवीकडे फिरल्यामुळे डिस्क पसरू लागते. चुकीच्या पद्धतीने काम करणे, वाचणे, उठणे, बसणे किंवा वाकल्यामुळे डिस्कवर सतत ताण येतो. त्यामुळे स्पाईनच्या नर्व्हजवर दबाव येतो आणि त्यामुळे कंबरदुखी सुरू होते.

स्लिप डिस्क म्हणजे काय? 

स्लिप डिस्क हा आजार नसून तो शरीराच्या मशिनमधला एक तांत्रिक बिघाड आहे. वास्तविक डिस्क स्लिप होत नाही, तर स्पाईनल कॉर्डमधून काही पदार्थ बाहेर येतात. डिस्कचा बाहेरचा भाग हा मजबूत स्नायुंनी बनलेला असतो; तर मधल्या भागात एक तरल जेलीसारखा पदार्थ असतो. डिस्कमधील हा जेलीसारखा किंवा कुशनसारखा पदार्थ डिस्कमधून बाहेर येतो. त्यामुळे डिस्कच्या पुढे आलेल्या भागामुळे स्पाईनल कॉर्डवर दबाव पडतो. अनेकदा वयोमानानुसार हा तरल पदार्थ सुकून जातो किंवा अचानक झटक्यामुळे किंवा दबावामुळे स्नायू फाटतात किंवा कमजोर होतात. यामुळे पायांचे दुखणे वाढते. भारतात 20 टक्क्यांपेक्षा जास्त लोक स्लिप डिस्कने ग्रस्त आहेत.

सर्वसाधारण कारणं
1) बसताना चुकीच्या पद्धतीने बसणे. झोपून किंवा वाकून वाचणे, अभ्यास करणे, कॉम्प्युटरसमोर बसून राहणे.
2) अनियमित दिनचर्या, अचानक झुकणे, वजन उचलणे, झटका लागणे, चुकीच्या पद्धतीने उठणे, बसणे.
3) शारीरिक हालचाल कमी होणे, व्यायामाचा अभाव, न चालण्यामुळेही स्नायू कमजोर होतात. खूप थकल्यामुळेही पाठीच्या कण्यावर ताण येतो.
4) अत्याधिक शारीरिक श्रम, पडणे, घसरणे,अपघातामुळे जखम होणे, बराच काळ ड्रायव्हिंग करण्यानेही कण्यावर किंवा डिस्कवर ताण पडतो.
5) वाढत्या वयानुसार हाडांची झीज होते आणि त्यामुळेही डिस्कवर ताण पडतो.
खास कारणं
1) सांध्यांची झीज झाल्यामुळे.
2) कंबरेच्या हाडामध्ये किंवा पाठीच्या कण्यामध्येे जन्मजात विकृती किंवा संक्रमण.
3) पायामध्येे जन्मत:च काही विकार असणे.
वयाच्या 30 ते 50 वर्षांच्या दरम्यान कमरेच्या खालच्या भागात स्लिप डिस्कची समस्या होण्याची शक्यता असते. वयाच्या 40 ते 60 वर्षांच्या दरम्यान सर्व्हाइकल व्हर्टिब्रामध्येे समस्या होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, आता 20 ते 25 वर्षांच्या तरुणांमध्येही स्लिप डिस्कची लक्षणं दिसू लागली आहेत. बराच काळ बसून काम करणे, खूप वेगात गाड्या चालविणे, सीट बेल्ट न बांधता गाडी चालविणे, यामुळे या समस्या वाढत आहेत. अचानक ब्रेक लावल्याने शरीराला झटका बसतो आणि त्यामुळे डिस्कला मार बसू शकतो.

सामान्य लक्षणं

  • नसांवर दाब पडल्यामुळे कंबरदुखी, पायदुखी, पाय आणि पायाची बोटे सुन्न होणे.
  • पायाचा अंगठा किंवा पंजा कमजोर होणे
  • स्पाईनल कॉर्डच्यामध्ये दाब पडल्यामुळे अनेकदा मांड्या आणि त्याभोवतीचा भाग सुन्न पडणे.
  • कंबरेच्या खालच्या भागात असह्य वेदना.
  • चालणे, फिरणे, वाकणे यांसारख्या क्रिया करतानाही प्रचंड वेदना होणे.
  • वाकल्यामुळे किंवा खोकल्यामुळे शरीरातून करंट पास होतोय असा अनुभव येणे.

निदान आणि उपचार

प्रचंड वेदना, एक्स-रे, एमआरआय, लक्षणे आणि शारीरिक तपासणी करून डॉक्टर कंबरदुखी किंवा पाठदुखीचे कारण सांगतात. तपासणी करीत असताना स्पॉन्डिलायटीस, डीजनरेशन, ट्युमर , मेटास्टेज सारखी लक्षणेही अनेकदा दिसून येतात. सीटी स्कॅन, एमआरआय, माईलोग्राफी या टेस्टनी योग्य ते निदान होऊ शकते. या दुखण्याचे योग्य ते निदान होणे आवश्यक असते. त्यासाठी डॉक्टर दोनवेळा एमआरआय करायला सांगतात. अनेकदा स्लिप डिस्कची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत.

स्लिप डिस्कमध्ये रुग्णाला जास्तीत जास्त विश्रांती घेण्याची आवश्यकता असते. तसेच फिजियोथेरपीनेही यामध्ये होणार्‍या वेदना कमी होतात. स्लिप डिस्क असल्यास दोन ते तीन आठवडे पूर्ण विश्रांती घ्यावी लागते. वेदना कमी होण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक औषधे दिली जातात, तसेच मांसपेशींना आराम मिळावा म्हणून डॉक्टर स्टेरॉईडसही देतात. फिजियोथेरपीही वेदना कमी झाल्यानंतर केली जाते. बहुतेक रुग्णांना सर्जरीची गरज लागत नाही.

आपली जीवनशैली बदलणे किंवा जर ते शक्य नसेल, तर काही वेळ व्यायामासाठी देणे आवश्यक आहे. चालण्याचा व्यायाम अगदी कोणीही करू शकतो. बसण्याची पद्धत ताठ असावी, बराच काळ एकाच स्थितीत बसून काम करू नये तसेच बराच काळ एका स्थितीत उभे राहू नये. कोणतेही काम किंवा अतिश्रम टाळावेत. गाडी चालविताना शरीराला बसणारे झटके शक्यतो टाळावेत. जड वजन एकदम उचलू नये. उंच टाचेच्या चप्पल घालू नयेत. जास्त काळ वाकून काम करू नका. आपल्या जीवनात असे काही आवश्यक छोटे-मोठे बदल करून आपण आपली पाठदुखी, कंबरदुखी कमी करू शकतो.

-डॉ. महेश बरामदे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news