स्मृतिदिन : स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू

स्मृतिदिन : स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू
Published on
Updated on

संभाजीराजे आणि येसुबाई यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज (पहिले) यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त…

छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 18 मे 1682 रोजी रायगडाजवळील गांगवली (माणगाव) येथे झाला. क्रांतिकारक पिता संभाजीराजे आणि दूरद‍ृष्टीच्या मातोश्री येसुबाई यांनी त्यांची जडणघडण केली. 11 मार्च 1689 रोजी संभाजीराजांची हत्या झाली. त्याप्रसंगी शाहू महाराज फक्‍त सात वर्षांचे होते. महाराणी येसुबाई, बाळ शाहूराजे, छत्रपती राजाराम महाराज, ताराबाई हा सर्व राजपरिवार रायगडावर होता. मोगल सरदार झुल्फिकारखान याने रायगडाला वेढा टाकला. स्वराज्य रक्षणासाठी राजाराम महाराजांनी जिंजीला जायचे व येसूबाईंनी रायगडावर थांबून मोगलांशी लढा द्यायचा, असे निश्‍चित झाले. परंतु, मोगलांनी येसुबाई, बाळशाहू आणि राज परिवाराला कैद केले व पुढे अठरा वर्षे शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते. अर्थात मानसन्मानाने स्वतंत्र अशी राजपरिवाराची व्यवस्था होती. औरंगजेबाने सर्व राजपरिवाराला, त्यांच्या सैन्याला सन्मानाने वागविले. शाहू महाराजांचे जन्म नाव शिवाजी असे होते. औरंगजेब शाहूंना उद्देशून म्हणाला, 'हा तर खूपच साव (सज्जन) आहे.' सावचा सावू अर्थात शाहू असा नामोल्लेख झाला. हेच ते संभाजीपुत्र पहिले छत्रपती शाहू महाराज!

औरंगजेबाची कन्या बेगम झिनत-उन-निसाने राज परिवारांचा उपमर्द होणार नाही याची काळजी घेतली. मोगलांच्या छावणीत असतानाच शाहू महाराजांचे जाधवराव यांची कन्या राजसबाई आणि कण्हेरखेडच्या शिंदे यांची कन्या अंबिकाबाई यांच्याशी असे दोन विवाह झाले. पुढे शिर्के यांच्या सकवारबाई आणि मोहित्यांची सगुनाबाई अशा चार महाराण्या होत्या. बिरुबाई ही त्यांची दासी होती. 20 फेब्रुवारी 1707 रोजी औरंगजेबाचा अहमदनगर येथे मृत्यू झाला. मोगल छावणी उत्तरेकडे जात असताना बेगम झिनत-उन-निसाच्या आग्रहाने औरंगजेबपुत्र आजमशहा याने शाहू महाराजांची 8 मे 1707 रोजी भोपाळजवळ सुटका केली. शाहू महाराज पारदगढी येथे आले असता, तेथील सयाजी लोखंडे यांनी शाहू महाराजांच्या सैन्याला प्रतिकार केला, तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. त्या छोट्याशा लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला; परंतु सयाजी लोखंडे मृत्युमुखी पडले, तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांचे लहान मूल शाहू महाराजांच्या पालखीत टाकले व म्हणाली, 'यास वाचवावे. अन्यायी होते ते मारले गेले. हे मूल आपणास वाहिले आहे.' शाहू महाराजांना त्या लढाईत यश मिळाले. फत्ते झाले म्हणून शाहू महाराजांनी त्या बाळाचे नाव फत्तेसिंह भोसले, असे ठेवले. त्या मुलाला पुत्रवत वाढविले. त्याला स्वतःचे आडनाव दिले. त्यांना पुढे अक्‍कलकोटचे राजे केले.

सर्व संकटांवर मात करून शाहू महाराज खेड, जेजुरी, वीर, वाईमार्गे 1 जानेवारी 1708 रोजी सातार्‍यात पोहोचले. त्यांनी सातारा राजधानी केली. 12 जानेवारी 1708 रोजी शाहू महाराजांनी सातारा येथे राज्याभिषेक केला. शाहूनगर वसविले. जनतेच्या पाण्याची, सुरक्षिततेची व्यवस्था केली. महाल बांधला व त्यानंतर ते मोहिमेवर निघाले. शाहू महाराजांनी संताजी जाधव यांना सेनापती केले. बाळाजी विश्‍वनाथ यांना सेनाकर्ते केले. संताजी जाधव यांच्यानंतर खंडेराव दाभाडे यांना सरसेनापती केले. 1719 मध्ये सैन्य पाठवून मोगल बादशहाकडून शाहू महाराजांनी चौथाईचे अधिकार मिळविले व मातोश्री येसुबाई, सावत्र बंधू मदनसिंग, सेवक, राजपरिवार यांची सुटका करून घेतली. याकामी सरसेनापती खंडेराव दाभाडे, संताजी भोसले, बाळाजी विश्‍वनाथ, उदाजी पवार आणि सय्यद बंधू इत्यादी वीरांनी मोलाची जबाबदारी पार पाडली. याकामी संताजी भोसले दिल्ली येथे शहीद झाले. साम्राज्यविस्तारासाठी त्यांनी फत्तेसिंग भोसले यांना दक्षिणेत, तर कानोजी आंग्रे आणि त्यांच्या पुत्राने कोकणभूमी, रघूजी भोसले यांना बंगालपर्यंतचा, सेनाकर्ते बाळाजी विश्‍वनाथ, बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर यांना दिल्लीपर्यंतचा भाग जिंकण्यासाठी पाठवले. खंडेराव दाभाडे, त्रिंबकराव दाभाडे, उमाबाई दाभाडे, पिलाजी गायकवाड यांना गुजरात मोहिमेवर पाठवले. ज्या मोगलांनी स्वराज्याला सळो कि पळो करून सोडले त्यांना शाहूंचा आधार होता. शाहू महाराजांनी दिलेल्या संधीमुळे मराठा सरदारांनी जवळजवळ संपूर्ण भारत देश जिंकून घेतला. गृहकलह नसावा म्हणून मातोश्री ताराबाई आणि सावत्र बंधू संभाजीराजे यांच्याशी तह करावा व अंतर्गत वाद कायमचा मिटवावा, ही शाहू महाराजांची प्रांजळ भूमिका होती. त्यातूनच वारणा नदीच्या उत्तरेकडील राज्य शाहू महाराजांचे व दक्षिणेकडील राज्य संभाजीराजांचे असा वारणेचा तह 13 एप्रिल 1731 रोजी सातारा येथे झाला. शाहू महाराजांनी कोणाचाही मुलाहिजा बाळगला नाही. जानराव निंबाळकर हे सातारा प्रांतातील प्रजेला त्रास द्यायचे. तेव्हा शाहू महाराजांनी 10 मार्च 1726 रोजी पत्र लिहून निक्षून सांगितले की, ऐसी वर्तणूक न करणे. शाहू महाराजांनी फौजेतील सैनिक, अधिकार्‍यांना आज्ञा केली होती की, कोणी एकाही कबाड घास लकडीसुद्धा उपद्रव करू नये. जे घेणे ते विकत घ्यावे. यात जो बकैदी करील त्याचा हात-पाय तोडीला जाईल. दाभाडे- पेशवे यांना जवळ बोलावून ते म्हणाले, आपसातील कलह अयुक्‍त (अयोग्य) आहे. शाहू महाराज कुटुंबवत्सल होते. मातोश्री येसुबाई, मातोश्री ताराबाई, मातोश्री राजसबाई यांना त्यांनी अत्यंत सन्मानाने, आदराने वागवले. सावत्र बंधू मदनसिंग यांना प्रेमाने वागवले. अशा उदात्त अंतःकरणाच्या शाहू महाराजांचा मृत्यू 15 डिसेंबर 1749 रोजी सातारा या ठिकाणी झाला. लोककल्याणकारी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन!

– डॉ. श्रीमंत कोकाटे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news