सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. ग्रामीणमध्ये मात्र रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील निर्बंध कमी करण्याचा प्रयत्न असून ग्रामीणमध्ये लवकरच निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा बैठकीनंतर पत्रकार बैठकीत स्पष्ट केले.
भरणे यांनी कोरोना परिस्थितीचा जिल्हा प्रशासकीय अधिकार्यांकडून शुक्रवारी दुपारी सात रस्ता येथील नियोजन भवनाच्या सभागृहात आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आदी उपस्थित होते.
यावेळी भरणे म्हणाले, शहरातील कोरोना रग्णांची संख्या कमी असल्याने व्यापारी संघटनाकडून निबर्र्ंध कमी करून व्यवसायासाठी वेळ वाढविण्याची मागणी होत आहे.
व्यापार्यांची मागणी रास्त असून, निर्बंध कमी करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्याशी संपर्क साधून शहरातील निर्बंध कमी करण्यात येतील.
ते म्हणाले, सोलापूर शहरात कोरोना संक्रमणाचा दर 1.87 टक्के तर ग्रामीणमध्ये 3.5 टक्के इतका आहे. शहरात कोरोनाचे 66 तर ग्रामीणमध्ये4 हजार 280 रुग्ण उपचार घेत आहेत. ग्रामीण भागात शुक्रवारी एकाच दिवशी 595 रुग्ण आढळून येत असल्याने ही धोक्याची घंटा ठरत आहे.
भरणे म्हणाले, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, करमाळा व माढा या पाच तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वेळीच खबरदारी बाळगून काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण कमी करण्यासाठी आणखी कडक उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या आठ दिवसात लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्बंध कडक करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.
म्युकरमायकोसीसचे रुग्ण कमी होत आहेत. सध्या या रोगाचे 98 रुग्ण आहेत. या रोगाने आतापर्यंत 89 रुग्णांचा मुत्यू झाला आहे. कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी पुरेशी औषधे, बेड व ऑक्सीजनची व्यवस्था उपलब्ध असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. ग्रामीण भागातील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामासंदर्भात पत्रकारांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला. अर्धवट कामामुळे अनेकांचे बळी जात असल्याची बाब पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावेळी भरणे यांनी यांनी तातडीने स्मार्ट सिटीचे आयुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांना बोलावून घेत याबाबत जाब विचारला. शहरातील कामे संथगतीन होत आहेत. रस्त्यावरील महावितरणच्या डीपी खुल्या आहेत. हे काय बरोबर नाही राव. तीस रुपयांचे कुलूप लावायलाही सांगाव लागतं का, असा प्रश्न त्यांनी यावेळी अधिकार्यांना उपस्थित केला.