सोलापूर : वानराच्या अंत्ययात्रेला लोटला सारा जनसागर; टाळमृदंगाच्या गजरात केला अंत्यविधी

सोलापूर : वानराच्या अंत्ययात्रेला लोटला सारा जनसागर; टाळमृदंगाच्या गजरात केला अंत्यविधी

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : सोलापूर येथे वानराच्या अंत्ययात्रेला संपूर्ण गावाने उपस्थिती लावली. गेल्या काही दिवसापासून उळे (ता.दक्षिण सोलापूर) येथे मुक्काम ठोकलेल्या तीन वानरांपैकी एका वानराचा झाडावरून पडल्याने सोमवारी (दि.२२ऑगस्ट) सायंकाळी दुर्दैवी अंत झाल्याने ग्रामस्थांनी त्याची टाळमृदंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढली अन मारुती मंदीराशेजारी त्याचा विधिवत अंत्यविधी केला.

गेल्या काही दिवसापासून येथे तीन वानरांचा मुक्काम होता. ग्रामस्थांकडूनही त्यांचा चांगला पाहुणचार सुरु होता. गावातील घराघरावरुन व झाडावरुन उड्या मारत फिरणाऱ्या या वानरांमुळे बच्चे कंपनीला मनमुराद आनंद मिळत होता. असे सारे व्यवस्थित सुरु असतानाच सोमवारी सायंकाळी पाच वाजता या तीन वानरापैकी एका वानराचा चींचेच्या झाडावरून उडी घेत असताना तोल गेला अन उंचावरुन खाली जमिनीवर पडल्याने त्या वानराचा मृत्यू झाला.

अन्य दोन वानरांनी त्या मृत वानरास घटृ मिठी मारुन जोरजोरात रडायला सुरवात केली. हा गलका ऐकून ग्रामस्थ जमा झाले. त्या मृत वानरावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावातील तरुणांचे प्रयत्न अन्य दोन वानरांच्या प्रतिकारामुळे शक्य होत नव्हते. मृत वानराजवळ एकासही जाणे कठीण झाले होते. त्यावेळी काही तरुणांनी शक्कल लढवत सुतळी बाँम्ब फोडले. त्या आवाजाने मृत वानराजवळून अन्य दोन वानरे झाडावर चढून बसले. त्याचवेळी काही तरुणांनी मृत वानरास बाजूला घेत त्याच्या अंत्यविधीची तयारी केली.

वानर हे हनुमंताच्या कुळातील मानण्याची परंपरा असल्याने ग्रामस्थांनी त्या मृत वानराची टाळमृदंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढली. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. त्या मृत वानरास ग्रामदैवत मारुती मंदीराशेजारी समाधी देण्यात आली. यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच तरुण व महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news