सोलापूर : पाण्याविषयी गप्प बसाल तर घरासमोर अ‍ॅटमबॉम्ब फोडू

सोलापूर : पाण्याविषयी गप्प बसाल तर घरासमोर अ‍ॅटमबॉम्ब फोडू

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  सध्या जिल्ह्यातील उजनीचे पाणी पळविण्याचा घाट बारामतीकरांनी घातला असून, त्याला शासन आणि प्रशासन सहकार्य करीत आहेत. याबाबत प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले असेल तर तुम्हाला जागे करण्यासाठी तुमच्या घरासमोर अ‍ॅटमबॉम्ब फोडू, असा इशारा उजनी धरण बचाव संघर्ष समितीच्या वतीने शेतकरी नेते अतुल खुपसे, जलतज्ज्ञ अनिल पाटील आणि प्रा. शिवाजी बंडगर यांनी पत्रकार परिषदेत दिला. सोमवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.

बारामती आणि इंदापूर तालुक्यातील शेतीला पाणी नेण्यासाठी लाकडी-निंबोडी योजनेच्या नावाखाली नियोजनात नसताना उजनीतील पाणी बारामतीला आणि इंदापूरला पळविण्याचा घाट महाविकास आघाडी सरकारने घातला आहे. त्याला पालकमंत्री दत्तात्रय भरणे सहकार्य करीत आहेत. त्या संदर्भात जिल्ह्यात आता लोकचळवळ उभा करण्याची गरज आहे. त्यासाठीच रविवारी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. शेतकरी संघटना गेल्या दोन महिन्यांपासून याविषयी आंदोलन करीत आहे. मात्र, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, माजी मंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत, हे सोलापूकरांचे आणि शेतकर्‍यांचे दुर्दैव असल्याची खंत यावेळी जलतज्ज्ञ अनिल पाटील यांनी बोलून दाखविली.

यापूर्वीच उजनीच्या पाण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. सध्या वाटप झालेल्या पाण्यातून उजनी धरणात पाणी शिल्लकच नाही. तरीही बारामतीकरांनी आपल्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी उजनीच्या पाण्यावर दरोडा टाकण्याचा घाट घातला आहे. त्या योजनेसाठी आता जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जवळपास 350 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरीही दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अनेक सिंचन योजना अपूर्ण असताना त्या योजनेला कवडीचीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्या योजना पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री आग्रही नाहीत. मात्र, बारामती आणि इंदापूरसाठी मात्र तातडीने प्रयत्न सुरू आहेत. जर हे पाणी बारामती इंदापूरला गेले तर जिल्ह्यातील उर्वरित सिंचन योजना पूर्ण करणे अशक्य होईल आणि त्यासाठी पाणीच शिल्लक राहणार नाही.

त्यामुळे उजनीचे पाणी वाचविण्यासाठी आता सर्वपक्षीय आंदोलन आणि चळवळ उभी करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वसामान्य शेतकरी तसेच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि सहभागी व्हावे यासाठी सगळ्यांना निमंत्रण पत्रिका पाठविण्यात येणार आहेत. निमंत्रण देऊनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या आंदोलनात सामील झाले नाहीत, तर त्यांच्या घरासमोर अ‍ॅटमबॉम्ब फोडू, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी राज सलगर, सोहम लोंढे, सुहास घोडके यांच्यासह संघर्ष समितीचे नेते उपस्थित होते.

भविष्यात प्यायलाही पाणी उरणार नाही :  पाटील 

उजनी धरण 110 टीएमसीचे असले तरी, त्यापैकी यापूर्वीच 84 टक्के पाणी वाटप झालेले आहे. काही योजना नीरा-भीमा स्थिरीकरण झाल्यानंतर पुढे मराठवाड्याला देण्यात येणार आहेत. स्थिरीकरणातून पाणी येण्यापूर्वीच उजनीतून पाणी नेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जर नीरा स्थिरीकरणातून पाणी उजनीत आले नाही, तर भविष्यात जिल्ह्यात प्यायलाही पाणी शिल्लक राहणार नाही, असा सावधानतेचा इशारा जलतज्ज्ञ पाटील यांनी दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news