दक्षिण सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील 62 हजार पशुधन लाळ खुरकतीच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. सर्वसाधारणत: पावसाळ्यात जनावरांमध्ये हा आजार दिसून येतो. हा आजार येऊ नये, म्हणून मार्च-एप्रिल महिन्यांत याच्या लसी केंद्राकडून येतात आणि जून महिन्यात याचे एकाचवेळी लसीकरण होत असते. मात्र, यंदा 15 जुलै ओलांडली तरी अद्याप केंद्राकडून लाळ खुरकतीच्या लसी आल्या नसल्याने जनावरांना लाळ खुरकतीचा सामना करावा लागणार आहे.
लसीकरण वर्षातून दोनदा केले जाते. एपिल ते मे महिन्यात लसी उपलब्ध होतात आणि त्याच्या लसीकरणाची सुरुवात जून महिन्यात करण्यात येते. ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात लसी उपलब्ध होतात आणि त्याचे लसीकरण डिसेंबर महिन्यापासून करण्यात येते.
हा आजार देशभरात असून, याचे समूळ उच्चाटन होण्यासाठी देशभरातून एकाचवेळी याचे लसीकरण होत असते. ज्या पद्धतीने पोलिओ समूळ उच्चाटनासाठी ठराविक तारखांना ठराविक वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येते, त्याच पद्धतीने लाळ खुरकतीचीच्या लसीकरण कार्यक्रमास एकाचवेळी सुरुवात होते.
दक्षिण सोलापूर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील 62 हजार जनावरे लाळ खुरकतीच्या प्रतिबंधात्मक लसींच्या प्रतीक्षेत आहेत. गत महिन्यात मान्सूनपूर्व घटसर्प अणि फर्या प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे. आता लाळ खुरकत प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. ज्या जनावरांना युआयडी नंबर देण्यात आला आहे, अशाच जनावरांना हे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण सोलापूरचे पशुधन विकास अधिकारी डॉ. रणजित जाधवर यांनी दिली होती. मात्र, जुलैचा पंधरवडा उलटला तरी लसीकरण सुरू झाले नसल्याने पश्ाुपालकांतून लाळ खुरकत प्रतिबंधात्मक लसीकरण कधी सुरू होणार, अशी विचारणा होत आहे.
लाळ खुरकतीच्या आजारामुळे दुग्ध उत्पादकता अणि जननक्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होऊन पश्ाुपालकांचे नुकसान होते. या आजारामध्ये जनावरांच्या जिभेला काटे येतात म्हणजेच तोंड आल्यासारखे होते. त्यामुळे जनावर वैरण खात नाही. त्याच्या तोंडातून लाळ गळायला लागते. जनावर लंगडायला लागते. अशक्त होते. त्यामुळे या आजाराचा विपरीत परिणाम जनावराच्या आरोग्यावर होऊन पश्ाुपालकांना नुकसानीला तोंड द्यावे लागते. त्याकरिता हे लसीकरण आवश्यक आहे.
केंद्राकडून आतापर्यंत लसी येणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापपर्यंत लसी आलेल्या नाहीत. लसी प्राप्त झाल्या की लसीकरणाला सुरुवात करू.
– डॉ. रणजित जाधवर,
पशुधन विकास अधिकारी, दक्षिण सोलापूर