सोलापूर : खंडणीसाठी अपहरण केलेल्या बालकाची कुंडल येथून सुटका

सोलापूर : खंडणीसाठी अपहरण केलेल्या बालकाची कुंडल येथून सुटका

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथून बेपत्ता झालेला 8 वर्षीय पृथ्वीराज सुरेश बिरादार याचा शोध घेण्यास वळसंग पोलिसांना यश आले असून त्याला सांगली जिल्ह्यातील कुंडल येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पृथ्वीराजचे 5 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्‍न झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली असून हे सर्वजण पृथ्वीराजच्या वडिलांच्या परिचयाचे असल्याचेही पोलिस तपासात निष्पन्‍न झाले आहे. रमेश भीमगोंडा बिरादार (वय 38, रा. हल्लूर, ता. मडोलगी, जि. बेळगाच, कर्नाटक),
नितीन उर्फ चार्ली धोंडप्पा शेडशाळ (रा. बाबानगर, ता. तिकोटा, जि. विजापूर सध्या रा. रामानंद नगर, नलावडे मळा, पलूस, जि. सांगली), लक्ष्मण किसन चव्हाण (वय 27, रा. लहू, ता. माढा, जि. सोलापूर), केदार बाळासाहेब शिवपुजे (वय 20, रा. कुंडल हायस्कुल रोड, ता. पलूस, जि. सांगली), संतोष धोंडप्पा शेडशाळ (वय 27, रा. किर्लोस्कर वाडी, पलूस, जि. सांगली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

धोत्री येथून 30 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी पृथ्वीराज सुरेश बिरादार या मुलाचे अपहरण करण्यात आल्याबाबत वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहृत मुलगा पृथ्वीराज याच्या वडिलांचा सराफाचा व्यवसाय असल्याने वळसंग पोलिसांनी या गुन्ह्याचा तात्काळ तपास सुरू केला.

सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे सोलापूर, सांगली, पुणे जिल्ह्यात तसेच कनार्र्टकातील काही जिल्ह्यामध्ये पृथ्वीराजची फोटोसह माहिती प्रसारित केली. तसेच सोशल मिडीयावरूनही याबाबत माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे गावामध्ये चौकशी करून सोलापूर शहर, कर्नाटक अशा वेगवेगळ्या ठिकाणी पाच तपास पथके पाठवून तपास केला.

वेगवेगळ्या ठिकाणाहून पोलिसांनी तांत्रिक माहितीच्याआधारे पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील कुंडल येथून एका संशयित आरोपीच्या ताब्यातून पृथ्वीराजला ताब्यात घेतले. तर इतर चार संशयित आरोपींना सांगली जिल्ह्यातील कुंडल, पलूस, बेळगाव जिल्ह्यातील हल्लूर याठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे.

ताब्यात घेण्यात आलेले संशयित आरोपी हे पृथ्वीराजचे वडील सुरेश बिरादार यांच्या ओळखीचे असून त्यापैकी एकाचा सराफाचा व्यवसाय आहे. 5 लाख रुपयांच्या खंडणीसाठी पृथ्वीराजचे अपहरण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

पोलिस पथकाची गावातून मिरवणूक

धोत्री येथून अपहरण झालेल्या 8 वर्षीय पृथ्वीराजला वळसंग पोलिसांनी संशयित आरोपींच्या ताब्यातून सुखरूप परत धोत्री येथे आणल्यानंतर धोत्री ग्रामस्थांनी पृथ्वीराजला डोक्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली. यावेळी धोत्री ग्रामस्थांकडून वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले व त्यांच्या पथकाचा सत्कारदेखील करण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news