सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव ओम्नी कारचालकाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघा सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. अन्य सहाजण जखमी झाले. सोमवारी (दि. 4) दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूर-मोहोळ रस्त्यावरील सारोळे पाटीजवळ ही दुर्घटना घडली. अपघातातील मृत व जखमी हे सर्वजण लातूर जिल्ह्यातील रोकडा सावरगाव येथील रहिवासी आहेत.
मृत सख्या भावांतील दयानंद अण्णाराव बेलाळे (वय 30) असे मृत पोलिस कॉन्स्टेबलचे नाव असून, त्याचा भाऊ सचिन अण्णाराव बेलाळे (वय 32, दोघेही रा. रोखडा सावरगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) अशी मृतांची नावे आहेत, तर स्वाती ऊर्फ राणी सचिन बेल्लाळे (वय 22), दीपाली ऊर्फ जयश्री दयानंद बेलाळे (वय 25), त्रिशा (वय 8) आणि श्लोक (वय 1 वर्ष) अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातातील मृत व जखमी हे सर्वजण पंढरपूर लातूरहून विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. सोमवारी दुपारी दर्शन घेऊन ते लातूरला ओम्नी कारने (एम.एच. 12 /एन.ई. 4487) परत निघाले होते. यावेळी पंढरपूरहून मोहोळकडे निघालेला ट्रक (एम. एच. 12/एफ. झेड. 7377) सारोळे पाटीजवळील सह्याद्री ढाब्या समोर रस्त्याकडेला ट्रक थांबला होता.
भरधाव वेगाने असलेल्या ओम्नी कारचालकाला रस्त्यावर थांबलेला ट्रक न दिसल्याने कारने मागून जोराची धडक दिली. यात दयानंद व त्याचा भाऊ सचिन या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दोघांच्या पत्नी स्वाती व दीपाली व मुले त्रिशा व श्लोक हे सर्व जण गंभीर जखमी झाले. यांना खाजगी वाहनातून सोलापूर येथील खाजगी सीएनएस या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक हिंम्मत जाधव, पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांनी पळून जाणार्या ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.