सोलापूर : ‘एबीडी’मधील नळांना आता ‘ई-मीटर’

सोलापूर : ‘एबीडी’मधील नळांना आता ‘ई-मीटर’
Published on
Updated on

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा :  शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने चाटी गल्ली परिसरात लवकरच प्रायोगिक तत्वावर योजना राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत स्मार्ट सिटीच्या 'एबीडी' एरिया नळांना ई-मीटर बसविण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती मनपाचे प्रशासक तथा आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.

स्मार्ट सिटी कंपनी व महापालिका समन्वय समितीची बुधवारी बैठक झाली. बैठकीचा तपशील सांगताना आयुक्तांनी सांगितले की, या बैठकीत वॉटर ऑडिट, हायड्रोलिक व स्काडा प्रणालीसंदर्भात चर्चा झाली. शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून एबीडी एरियात नळांना ई-मीटर बसविण्यास सुरुवात झाली आहे. या एरियातील चाटी गल्ली परिसरात एकूण 435 मिळकती असून यापैंकी 205 मिळकतींना ई-मीटर बसविण्यात आले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल. तद्नंतर जलकुभांना फ्लोमीटर बसविण्याचे काम 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यानंतर चाटी गल्ली परिसरात दररोज पाणीपुरवठा करण्याची योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. ई-मीटर व फ्लोमीटरमुळे अनुक्रमे लोकांना पाण्याची किती गरज आहे, जलकुंभांमधून किती पाणीपुरवठा झाला व शिल्लक आहे आदींची चाचपणी करणे शक्य होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास टप्प्याटप्प्याने शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचे काम हाती घेणार आहोत, असे आयुक्तांनी सांगितले.

मेकॅनिकल मीटरही बसविणार

ई-मीटरची ज्या भागात आवश्यकता नाही, अशा भागांत पर्याय म्हणून मेकॅनिकल मीटरही बसविण्यात येणार आहे. यासंदर्भात धोरणात्मक निर्णय लवकर घेणार असून मीटर पुरविणार्‍या कंपन्यांची निश्चिती केली जाईल, जेणेकरुन नागरिकांना या कंपन्यांकडून मीटर घेऊन बसविता येईल. ई-मीटरची वॉरंटी पाच वर्षांची राहणार आहे.

शहराला पाणीपुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी नळांना मीटर लावणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या अनुषंगाने मनपातर्फे वॉटर ऑडिटचे काम सुरू असून आतापर्यंत 1 लाख 30 हजार मिळकतींचा सर्व्हे पूर्ण झाले. शहराच्या पाणीपुरवठ्याचे दिवस आणखीन कमी करता येईल का याची चाचपणीही एका आठवड्यात करणार, असेही ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news