सुरत येथील हिरे व्यापार्‍याने वरळीत विकत घेतला १८५ कोटी रुपयांचा बंगला

सुरत येथील हिरे व्यापार्‍याने वरळीत विकत घेतला १८५ कोटी रुपयांचा बंगला
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील जागेला सोन्याची किंमत आहे, यावर सुरत येथील हिरे व्यापार्‍याने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. कारण मध्य मुंबईतील वरळी सीफेस याठिकाणी असलेला 1 हजार 349 चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक बंगला सुरतच्या हिरे व्यापार्‍याने हरी कृष्णा एक्स्पोर्ट लिमिटेड या कंपनीच्या नावे तब्बल 185 कोटी रुपयांना खरेदी केला आहे.

30 जुलैला झालेल्या या व्यवहारामुळे वरळीतील प्रति चौरस फूट घराची किंमत 93 हजार रुपयांवर पोहोचली आहे. निश्चितच ही किंमत सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरील आहे.

वरळी सीफेसला असलेल्या या बंगल्याचे नाव पन्हार बंगलो असे आहे. तळघर, तळमजला आणि सहा मजले अशी या बंगल्याची अंतर्गत रचना आहे.

याआधी ही मालमत्ता एस्सार समूहाच्या आर्पे होल्डिंग्ज लिमिटेड या कंपनीच्या नावे होती. याउलट बंगला खरेदी करणारी कंपनी सुरतमधील प्रसिद्ध हिरे व्यापारी घनश्यामभाई धनजीभाई ढोलकिया यांच्या मालकीची आहे.

घनश्याम ढोलकिया हे सावजी ढोलकिया यांचे धाकटे बंधू आहेत. सावजी यांची ओळख देशातच नव्हे, तर जगात एक दानशूर मालक म्हणून आहे.

सावजी यांनीच 2018मध्ये त्यांच्या कंपनीतील तीन सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या कामगारांना मर्सिडीज कंपनीची आलिशान कार बक्षीस म्हणून दिली होती. त्याआधी 2014साली दिवाळी बोनस कंपनीतील तब्बल 500 कामगारांना फ्लॅट्स आणि हिर्‍यांचे दागिने भेट दिले होते.

आर्पे होल्डिंग्ज कंपनीने याच बंगल्यावर इंडिया बुल्स हाऊसिंगकडून 144 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यामुळेच बंगल्याची रक्कम इंडिया बुल्सला दिल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद केलेले आहे. याआधीही या बंगल्याचे अनेक व्यवहार झाल्याचे मालमत्तेचे कागद पाहता लक्षात येते.

मुंबई महानगरपालिकेने या बंगल्याखालील जमीन 13 ऑक्टोबर 1941 रोजी पहिल्यांदा वार्षिक एक रुपया दराने कुबालया राज यांना भाडेतत्त्वावर दिली होती. या बंगल्यामध्ये एकूण 15 अपार्टमेंट्स आहेत.

या बंगल्याचा वापर ढोलकिया कुटुंबासह कंपनीच्या काही खास कर्मचार्‍यांसाठी केला जाणार असल्याचे ढोलकिया कुटुंबाने सांगितले. सुरत च्या या हिरे निर्यातदार आणि दागिने तयार करणार्‍या कंपनीची वर्षाची उलाढाल तब्बल 7 हजार कोटी रुपये इतकी आहे.

या वर्षातील महागडी खरेदी

1 डी-मार्टचे राधाकृष्ण दमानिया यांनी मलबार हिलमध्ये 1 हजार 1 कोटी रुपयांना बंगला विकत घेतला होता. 5752 स्क्वेअर मीटरचा हा बंगला त्यांनी 1.6 लाख रुपये प्रति स्क्वेअर फुटाने खरेदी केला.

2 उद्योगपती अनुराग जैन यांनी ताडदेव येथे 2 फ्लॅट 100 कोटींना खरेदी केले.

3 महानायक अमिताभ बच्चन यांनी ओशिवरा येथे 5700 स्क्वेअर फुटांचे फ्लॅट 31 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news