सीमालढा : सीमाप्रश्नी मराठी बांधवांच्या पाठीशी

कोल्हापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित धरणे आंदोलनात हात उंचावून एकजुटीची वज्रमूठ दाखविताना समितीच्या पदाधिकार्‍यांसह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते. ( छाया ः नाज ट्रेनर )
कोल्हापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित धरणे आंदोलनात हात उंचावून एकजुटीची वज्रमूठ दाखविताना समितीच्या पदाधिकार्‍यांसह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते. ( छाया ः नाज ट्रेनर )

गेली 65 वर्षे कर्नाटक सरकारच्या जुलमी सत्तेविरोधात लोकशाही मार्गाने लढा सुरू आहे. महाराष्ट्रात येण्यासाठी धडपड करणार्‍या सीमाबांधवांच्या लढ्याला शनिवारी कोल्हापूरवासीयांनी सीमाप्रश्नाची ( सीमालढा ) सोडवणूक होईपर्यंत सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राहणार आहे, असा निर्धार व्यक्त केला. दै.'पुढारी'ने सीमा लढ्यासाठी बळ दिल्याचे अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

राजकीय पक्षांसह विविध संस्था, संघटना आणि नागरिकांनी येथील दसरा चौकातील धरणे आंदोलनाला ( सीमालढा ) भेट देऊन लढ्याला पाठबळ दिले. यावेळी 'रहेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल मे', 'खानापूर, निपाणी, बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,' या घोषणांनी संपूर्ण दसरा चौक दणाणून गेला.

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने येथील दसरा चौकात शनिवारी धरणे सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन केले होते. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

सीमा लढ्यातील पहिले सत्याग्रही पुंडलिकमामा चव्हाण, नारायण लाड, नारायण पाटील, शंकरराव पाटील, दे. भ. ऊर्फ देवाप्पा घाडी गुरुजी यांच्या हस्ते हुतात्म्यांंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वपक्षीय मंत्री, खासदार, आमदार यांनी पुढाकार घ्यावा.

यावेळी कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, शहराध्यक्ष विवेक गिरी, समिती नेते प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, महादेव घाडी, आबासाहेब दळवी, नारायण कार्वेकर, जयराम देसाई, लक्ष्मण कसर्लेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावचे सरचिटणीस किरण गावडे, बेळगाव तालुका सरचिटणीस मनोज पावशे, बेळगावच्या माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, नगरसेवक रवी साळोखे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनाला कोल्हापुरातील राजकीय पक्ष, संस्था, संघटनांसह नागरिकांनी सहभाग घेऊन सीमाप्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत कोल्हापूरवासीय आपल्या पाठीशी असल्याचा निर्धार व्यक्त केला. माजी आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, गुलाबराव घोरपडे, भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, मराठा शौर्यपीठचे प्रसाद जाधव, बबनराव रानगे, भाकपचे सतीश्चंंद्र कांबळे, दिलीप देसाई, जिल्हा बार असोसिएशचे अध्यक्ष अ‍ॅॅड. रणजित गावडे, कादर मलबारी यांनी आंदोलनस्थळी भेट जाहीर पाठिंबा दिला.

राजेश क्षीरसागर म्हणाले, सीमाबांधवांची सीमाभागात प्रचंड ताकद आहे. ती कायम ठेवा. एकजुटीने हा लढा यशस्वी करूया. मी सीमाबांधवांबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर लवकरच भेट घेणार असल्याचे आ. चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रमुख मागण्या…

महाराष्ट्र शासनाने कागल (जि. कोल्हापूर) येथे महाराष्ट्र विधानभवन बांधावे

गडहिंग्लज येथे वैद्यकीय महाविद्यालय व सुसज्ज हॉस्पिटल उभे करावे.

चंदगडपासून तिलारीपर्यंत फूडपार्क उभे करावेत. सेव्हन स्टार एमआयडीसी उभी करावी.

सांगली येथे टेक्निकल युनिव्हर्सिटी व्हावी. आयटी पार्क स्थापन केले जावे.

बिदर जिह्याजवळील उदगीर येथे विद्यापीठाची स्थापना करावी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news