'ट्विटर'सारख्या विश्वविख्यात कंपनीच्या 'सीईओ' पदावर झालेली पराग अग्रवाल यांची निवड भारतीयांसाठी अभिमानास्पदच आहे. सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्यासारखे अनेक भारतीय सध्या बड्या कंपन्यांचे 'सीईओ' पद भूषवत अशा कंपन्यांना प्रगतिपथावर अग्रेसर करीत आहेत. मात्र सध्याच्या नव्या युगात परदेशातील बड्या कंपन्यांच्या प्रमुख पदावर भारतीय व्यक्ती असणे इतकेच पुरेसे नाही. जागतिक स्तरावर डंका वाजवणार्या कंपन्याही भारतीयच असणे ही काळाची गरज आहे.
जागतिक पातळीवरील टेक कंपन्यांमध्ये सध्या भारतीय वंशाच्या लोकांचा डंका जोरात वाजत आहे. अनेक बड्या कंपन्यांच्या उच्च पदांवर भारतीय लोक विराजमान होत आहेत. ट्विटरच्या 'सीईओ'पदी झालेली पराग अग्रवाल यांची नवी नियुक्ती ही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू झालेल्या या गौरवशाली परंपरेचा नवा अध्याय आहे. सत्या नाडेला, सुंदर पिचाई, शांतनु नारायण यासारख्या अनेक उच्चपदस्थ भारतीयांच्या पंक्तीत आता पराग यांचीही वर्णी लागली आहे.
जागतिक पातळीवर भारतीय आयटी तज्ज्ञांचा गेल्या अनेक वर्षांपासून बोलबाला आहे. देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील देदीप्यमान प्रगतीमुळेच तो निर्माण झालेला आहे. भारतातील 'इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी' क्षेत्रामध्ये प्रामुख्याने दोन घटक आहेत, आयटी सर्व्हिसेस आणि 'बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग' (बीपीओ). भारतात आयटी उद्योगाचा देशाच्या जीडीपीमध्ये 8 टक्क्यांचा वाटा आहे. सध्या देशात आयटी-बीपीएम क्षेत्रात सुमारे 4.5 दशलक्ष कर्मचारी काम करीत आहेत.
मात्र तुलनेने देशातील आयटी कर्मचार्यांना योग्य वेतन मिळत नाही, असे मानले जाते. यामुळेच कदाचित अनेक आयटी तज्ज्ञ परदेशात जात असावेत, असे म्हटले तरी चालेल! परदेशात त्यांना मोठे वेतन आणि मोठ्या संधीही मिळतात. तिथे ते आपले कर्तृत्व गाजवून बड्या कंपन्यांचे 'सीईओ' बनण्याइतकी प्रगतीही करून दाखवू शकतात.
भारताच्या खाणीतून बाहेर पडलेले हे हिरे अन्य देशांच्या मुकुटाची शोभा वाढवत आहेत, हे नक्कीच हुरहुर लावणारे आहे! अमेरिकेत तर भारतीय आणि चिनी आयटी तज्ज्ञांना आजही मोठीच मागणी आहे. तेथील आयटी कंपन्यांमध्ये मोठा भरणा हा भारतीयांचाच आहे. स्ट्राईप कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ पॅट्रिक कोलेजन यांनी आपल्या ट्विटमध्ये बड्या टेक कंपन्यांमधील उच्चपदस्थ भारतीयांची जंत्रीच देऊन त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला आहे.
त्यांचीच रीघ ओढत 'टेस्ला' व 'स्पेस एक्स' सारख्या कंपन्यांचे प्रमुख असलेल्या एलन मस्क यांनीही म्हटले आहे की, अमेरिकेला भारतीय टॅलेंटचा मोठाच फायदा झाला आहे. मात्र भारतीय टॅलेंटचा असा फायदा खुद्द भारतालाच का होऊ नये, हा सर्व भारतीयांना पडणारा प्रश्न आहे!
देशात बंगळूर, हैदराबाद, चेन्नई, पुणे, दिल्ली-एनसीआर ही मोठी 'आयटी हब' आहेत. बंगळूरमध्ये तर दहा लाख कर्मचारी प्रत्यक्षपणे, तर 30 लाख कर्मचारी अप्रत्यक्षपणे या उद्योगाशी निगडित आहेत. बंगळूरला 'भारतातील स्टार्टअपची राजधानी' असेही म्हटले जाते. 2020 मध्ये हे शहर 44 टक्के युनिकॉर्न स्टार्टअप कंपन्यांचे घर ठरले होते. हैदराबादला तर 'सायबराबाद' किंवा 'हायटेक सिटी' असेही म्हटले जाते. अशी शहरे या क्षेत्राबाबत जगभरात आपला दबदबा राखून आहेत. अर्थातच, भारताच्या कॉम्प्युटर किंवा आयटी क्षेत्रातील यशाची बीजे शोधायची झाली तर आपण अगदी पंडित नेहरूंच्या काळापर्यंत मागे जाऊ शकतो.
देशातील पहिली अणुभट्टी 'अप्सरा'च्या काळातीलच 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ऑटोमेटिक कॅल्क्युलेटर' हा एक प्रकारे देशातील पहिलाच कॉम्प्युटर. भारताच्या आयटी सर्व्हिसेस इंडस्ट्रीचा जन्मही टाटांच्याच 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस' या मुंबईत 1967 मध्ये स्थापन झालेल्या कंपनीपासून झाला. सध्याही हीच देशातील अव्वल क्रमांकाची सर्वात मोठी आयटी कंपनी आहे.
मुंबईतच 1973 मध्ये सध्याच्या आयटी पार्कची पूर्वसुरी असलेल्या 'एसईईपीझेड' (सीप्झ) या पहिल्या सॉफ्टवेअर एक्स्पोर्ट झोनची स्थापना झाली. 1980 च्या दशकात देशातील 80 टक्के सॉफ्टवेअर निर्यात इथूनच होत होती. सध्याच्या काळात भारत हाच आयटीचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे. मात्र भारतीय टॅलेंटही देशाबाहेर 'निर्यात' होऊन त्याचा लाभ भारताला होण्याऐवजी अन्य देशांना होईल, असे घडू नये हे पाहिले पाहिजे.
भारतातील 'इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी' आणि टेलिकॉम क्रांतीसाठी अर्थातच राजीव गांधी यांना मोठे श्रेय दिले जाते. त्यांना 'डिजिटल इंडिया'चे आर्किटेक्टही म्हटले जाते. राजीव गांधी हे देशातील सर्वात तरुण पंतप्रधान होते. 1984 ते 1989 या पाच वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 21 व्या शतकातील भारताच्या तंत्रज्ञानात्मक पायाभरणीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.
देशातील संगणक क्रांतीविषयी त्यांना सल्लागार सॅम पित्रोदा यांनी मोलाची मदत केली. देशातील जनतेनेही नवे तंत्रज्ञान, संगणक यांचे शिक्षण घेण्यापासून ते दैनंदिन जीवनात त्याचा वापर करण्यापर्यंत उत्साह दाखवला आणि जगभरात भारताची प्रतिमा 'आयटी' क्षेत्रातील दबदबा निर्माण करणारा देश अशी झाली. याबाबत भारताने चीनलाही टक्कर दिली हे विशेष.
'आयटी' क्षेत्रातील भारतीय तरुणांसाठी अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये नवी दालने खुली झाली. या तरुणांना तिथे मोठ्या पगाराच्या नोकर्या आणि अनेक संधी उपलब्ध होऊ लागल्या. 'मायक्रोसॉफ्ट'चे सत्या नाडेला यांचे वार्षिक वेतन 5,100 कोटी रुपये आहे तर 'गुगल'ची एक कंपनी असलेल्या 'अल्फाबेट'चे सुंदर पिचाई यांचे वार्षिक वेतन 3300 कोटी रुपये आहे.'अडोबी'चे शांतनु नारायण यांचे वार्षिक वेतन 4500 कोटी रुपये आहे. आयबीएमचे अरविंद कृष्णा, मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे संजय मेहरोत्रा, पालो ऑल्टोचे निकेश अरोडा, व्हीएमवेअरचे रंगराजन रघुराम, अरिस्टा नेटवर्क्सच्या जयश्री उल्लाल, नेटअॅपचे जॉर्ज कुरियन हे भारतीयही उच्च पदांवर काम करीत आहेत.
मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुकसारख्या अनेक बड्या कंपन्यांमधील अन्यही महत्त्वाच्या पदांवर सध्या भारतीय वंशाचे लोक काम करीत असून त्यांनाही वार्षिक वेतन अतिशय चांगले मिळते. परदेशात अनेक भारतीय आपल्या कामातून नावलौकिक मिळवत आहेत, ही बाब भारतीयांसाठी नक्कीच भूषणावह आहे. मात्र भारतातही अशा ग्लोबल टेक कंपन्या अधिकाधिक निर्माण होऊन देशातील तरुणांकडून त्यांचा विस्तार होणेही अपेक्षित आहे.
देशात सध्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसनंतर इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो लिमिटेड, रेडिंग्टन इंडिया, टेक महिंद्रा, लार्सेन अँड टौब्रो इन्फोटेक यांसारख्या अनेक मोठ्या आयटी कंपन्या आहेत. देशाच्या गौरवात या कंपन्याही आपले योगदान देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया'सारख्या मोहिमांमुळे देशातील तरुणांना उद्योजक बनून देशाच्या प्रगतीला आपले योगदान देण्याची नवी प्रेरणाही मिळालेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून देशात अनेक तरुण नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे स्टार्टअप सुरू करीत आहेत. सोशल मीडियाच्या क्षेत्रातही जगातील बड्या कंपन्यांना तोडीस तोड अशा कंपन्या भारतातही बनत आहेत, हे एक सुचिन्हच आहे.
चीनने असे धोरण सुरुवातीपासूनच राबवलेले आहे. फेसबुक, ट्विटरसारख्या कंपन्यांना चीनने स्वतःच्या देशात कधीही भाव दिला नाही. चीनचे 'वीबो' हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म केवळ ट्विटरचाच नव्हे, तर फेसबुक व अन्यही काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा सज्जड पर्याय आहे. भारतातही ट्विटरला पर्याय ठरलेले 'कू' हे मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म झपाट्याने लोकप्रियता मिळवत आहे. इन्स्टाग्रामला 'एमएक्स टकाटक', व्हॉट्सअॅपला 'टेलिग्राम', 'टिकटॉक'ला 'चिंगारी' अॅपसारखे अनेक पर्यायी व स्वदेशी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झालेले आहेत.
'आयआयटी बॉम्बे'मधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले ट्विटरचे नवनियुक्त 'सीईओ' पराग अग्रवाल हे 2011 मध्ये ट्विटरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून रुजू झाले. 2017 मध्ये ते ट्विटरचे 'चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर' बनले. आता जॅक डॉर्सी यांच्यानंतर त्यांनी ट्विटरची 'चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर'पदाची धुरा स्वीकारलेली आहे. त्यांची ही प्रगती जागतिक स्तरावर भारतीय तरुणांनी सिद्ध केलेली क्षमताच दर्शवणारी आहे. अशी क्षमता असणारे अनेक तरुण आपल्या देशातही अनेक असतील. त्यांनी या क्षमतेचा वापर इथेच राहून देशाचा गुणगौरव वाढवण्यासाठी करावा, अशीही आपण अपेक्षा करू शकतो.
सचिन बनछोडे