सिडको बांधणार खारघर-तुर्भे लिंक रोड

सिडको बांधणार खारघर-तुर्भे लिंक रोड

खारघर ; पुढारी वृत्तसेवा : सिडकोने खारघर-तुर्भे लिंक रोड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई ते खारघर या प्रवासात वाहनचालकांचा प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार आहे. सिडको ने याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडेपाठवला आहे. अंदाजे 1,300 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची योजना यापूर्वी एमएसआरडीसीने केली होती. नंतर त्यांनी हा प्रकल्प सिडकोने हाती घ्यावा, अशी सूचना केली. आवश्यक शासन, पर्यावरण आणि इतर परवानग्या एका वर्षात मिळतील आणि प्रत्यक्षात बांधकाम दोन ते तीन वर्षांत होणे अपेक्षित आहे.

हा लिंक रोड तुर्भे येथून सुरू होईल आणि टेकड्या कापून जुईनगर मार्गे खारघरला जाईल. खारघर गाठण्यासाठी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील वाहनधारकांना सध्या सायन-पनवेल महामार्ग, ठाणे मार्गे जावे लागते. या मार्गामुळे थेट खारघर गाठता येणार आहे. बेलापूर रोड आणि पाम बीच रोड सध्याच्या 15 किलोमीटरवरून फक्त 5 किलोमीटर अंतरावर येणार आहे त्यामुळे प्रवासाचा वेळ 40 मिनिटांपासून 10 मिनिटांपर्यंत वाचविण्यात मदत होईल.

यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील भार कमी होण्यासोबतच इंधन आणि पैशांचीही बचत होईल. शनिवार, रविवारी अनेकदा बेलापूर ते खारघर दरम्यान वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या पहायला मिळतात. खारघर-तुर्भे लिंक रोड तयार झाल्यास वाहतुकीवरील ताण कमी होईल.

ठाणे, मुंबईतून तळोजा, एमआयडीसी परिसरात जाण्यासाठी देखील वाहनचालकांसमोर या मार्गाचा पर्याय निर्माण होईल. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, संजय मुखर्जी म्हणाले, सिडको ने तुर्भे आणि खारघर इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क दरम्यान थेट कनेक्टिव्हिटीसाठी एलिव्हेटेड किंवा ग्रेड-लेव्हल पध्दतीने खारघर-तुर्भे लिंक रोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा रस्ता चौपदरी आणि 5.49 किलोमीटर लांबीचा असेल. तर बोगदा 1.763 किलोमीटरचा असेल. रस्ता बनवताना पर्यावरणाच्या नियमांचेही पालन केले जाईल, असे मुखर्जी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news